‘हर हर महादेव’च्या जयघोषाने निनादणार सातपुडा पर्वतरांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:14 PM2023-09-04T12:14:33+5:302023-09-04T12:16:22+5:30
धारगड यात्रेत हजारो भक्तांची मांदियाळी, श्रावणातला तिसरा सोमवार
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : चिखलदरा तालुक्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित क्षेत्रात असलेल्या व विदर्भातील प्रसिद्ध धारगड येथील शिव मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भरणाऱ्या यात्रेसाठी हजारो भक्त दर्शनासाठी जातात. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान सातपुडा पर्वतरांगेतील भक्तांची गर्दी व ‘हर हर महादेव’च्या स्वरांनी आसमंत निनादणार आहे.
अकोट येथील परिवहन मंडळातर्फे बसगाड्या पाठविण्यात येतात. शेकडोच्या संख्येने पायी जाणाऱ्या भक्तांसह कावड यात्रेमध्ये समावेश असतो, हे विशेष. अकोट व अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांतर्फे महाप्रसाद, चहा-पोहे व इतर फराळाच्या साहित्याचे वाटप यात्रेदरम्यान भाविकांना केले जाते. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ पासून ४ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत ही यात्रा राहणार आहे. यादरम्यान खटकाली व पोपटखेडा तपासणी गेटवरूनच शिवभक्तांना व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात प्रवेश मिळेल. वन्यजीव विभागाच्या अटी-शर्ती यांचे तंतोतंत पालन भक्तांना करावे लागणार आहे. अकोला, अमरावतीसह लागून असलेल्या मध्य प्रदेश व विदर्भातील इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भक्त यात्रेत सहभागी होणार आहेत.
सातपुड्यातील धारगड
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील धारगड येथे भाविक शिवपूर, कासोद, अमोना मार्गे पाऊलवाटेने जातात. तीन हजार फूट उंचावर गगनभेदी अशा पर्वतरांगांमध्ये हे मंदिर वसले आहे. नरनाळा किल्ल्याजवळ असलेल्या येथील शिवालयात स्वयंभू शिवलिंग आणि नंदी असल्याची आख्यायिका आहे. उंचावरून कोसळणारा धबधबा भक्तांचा जलाभिषेक करतो. पाऊलवाटेने २५, तर वाहनाच्या रस्त्याने ४५ किलोमीटर अंतर आहे.