‘लिव्ह इन’चा धक्कादायक अंत; 'त्याने' हाकलून दिलं, तिनं टोकाचं पाऊल उचललं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 03:25 PM2022-05-04T15:25:35+5:302022-05-04T15:48:44+5:30
त्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन भाड्याच्या खोलीतून हाकलून दिले.
अमरावती : बराच काळ ‘लिव्ह इन’ मध्ये काढल्यानंतर जोडीदाराने हाकलून दिल्याने हतबल झालेल्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. १ मे रोजी दुपारी २ ते ३ च्या सुमारास लुंबिनी नगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, लुंबिनी नगर येथील एका तरुणीचे कपिल सोनोने याच्यासोबत सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते प्रेमसंबंध दोघांच्या घरी माहीत झाल्याने कपिलने लग्न करण्यासदेखील होकार दिला. त्यानंतर कपिल व ती तरुणी बरेच महिने ‘लिव्ह इन’मध्ये पती-पत्नीसारखे राहिले. परंतु,एप्रिल २०२१ पासून कपिलने तिच्यासोबत राहण्यास टाळाटाळ चालविली. त्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन भाड्याच्या खोलीतून हाकलून दिले. त्यानंतर आरोपी कपिल हा इंदूरला निघून गेला. ती त्याला भेटण्यास इंदूरला देखील गेली. मात्र, तो तेथे तिला भेटला नाही. उलट त्याने तिला मानसिक त्रासच दिला.
जानेवारीमध्ये दिली होती तक्रार
दरम्यान, १७ जानेवारी २०२२ रोजी तरुणीने कपिल सोनोने विरुद्ध महिला सेवाभावी संस्थांकडे तक्रार दिली. घरच्यांच्या दबावामुळे लग्न करू शकत नसल्याचे त्याने सांगितले. त्याने लग्नास नकार दिल्याने तिचे मनोधैर्य खचले. लिव्ह इनमध्ये राहूनही तो लग्नास नकार देत असल्याने तिने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. १ मे रोजी दुपारी लुंबिनी नगर येथे राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या बहिणीला सहाही आरोपींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार मृताच्या भावाने ३ मे रोजी दुपारी नोंदविली.
याप्रकरणी कपील अशोक सोनोने (२८), अशोक पुंडलिक सोनोने (५९), चंद्रमणी अशोक सोनोने (३०) व तीन महिला (सर्व रा. वरुणनगर,महादेवखोरी) अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारती मामनकर या करीत आहेत.