राज्य शासनाने बदल्यांसाठी कायदाच बदलला; अफलातून निर्णय

By गणेश वासनिक | Published: August 30, 2024 04:00 PM2024-08-30T16:00:54+5:302024-08-30T16:04:32+5:30

Amravati : मंत्रालय हाऊसफुल्ल, न्यायालयाचा मार्ग बंद

The state government changed the law itself for transfers; | राज्य शासनाने बदल्यांसाठी कायदाच बदलला; अफलातून निर्णय

The state government changed the law itself for transfers;

अमरावती : राज्य सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी राज्य शासनाने चक्क बदल्यांचा कायदाच बदलला आहे. त्याकरिता राज्यपालांच्या आदेशाने ‘राजपत्र’ प्रसिद्ध झाले असून आता कर्मचाऱ्यांना न्यायालयीन मार्ग त्यामुळे बंद झालेला आहे. मे ऐवजी ऑगस्टमध्ये होणाऱ्या या बदल्यांमुळे दोन महिन्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे मात्र निश्चित आहे.

राज्य शासनाचे ३३ विभाग आणि महामंडळे आस्थापनावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी मे महिन्यात प्रशासकीय बदल्या होतात. त्यानंतर विनंती बदल्या केल्या जातात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे राज्य शासनाला मे मध्ये प्रशासकीय बदल्या करता आल्या नाहीत; मात्र जूनमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर बदल्या करणे शक्य असताना शासकीय बाबूंनी बदल्यांचे धोरण न राबविल्यामुळे यंदा राज्यात शासकीय बदल्या होणार नाहीत, असा समज झाला होता; मात्र निवडणूक आयोगाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा फतवा काढल्यामुळे राज्य शासनाची गोची झाली. कालावधी निघून गेल्यानंतर प्रशासकीय बदल्या कशा करण्यात संभ्रम निर्माण झालेला असतानाच राज्य शासनाने चक्क कायद्यात बदल करून निवडणुकीच्या तोंडावर ‘अर्थ’पूर्ण राजकारण करण्यासाठी बदली अधिनियम २००५ मध्ये सुधारणा केली आहे. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने २९ ऑगस्ट २०२४ रोजी बदल्यांसंदर्भात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या आदेशाने ‘राजपत्र’ प्रसिद्ध केले आहे.

राज्यपालांच्या आदेशाने राजपत्र जारी
कुठलाही नवीन कायदा किंवा बदल करायचा असल्यास मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन तो निर्णय राज्यपालांकडे कायदा पारीत करण्यासाठी पाठविला जातो.बदली अधिनियम २००५ नुसार राज्य शासन दर वर्षी मे महिन्यात राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करीत असते; मात्र यावेळी विलंब झाला असल्याने शासनाने मंत्रिमंडळात निर्णय घेत २००५ च्या बदली कायद्यात बदल केला आहे. राज्यपालाने यास मंजुरी प्रदान करीत राजपत्र जारी केले आहे. बदली अधिनियम (सुधारणा) ऑगस्ट २०२४ असे म्हणावे लागणार आहे. ज्या नवीन अधिनियमांमुळे राज्यात दोन दिवसात बदल्यांचे सत्र राबविले जाणार आहे.

मंत्रालय हाऊसफुल्ल, अधिकाऱ्यांची गर्दी
राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बदल्या होणार असल्याचे संकेत मिळताच राज्य सेवेतील अधिकारी सोयीचे ठिकाण मिळण्यासाठी मंत्रालयात ठाण मांडून आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदल्या होणार असल्याने अनेकांचे खिसे गरम होतानाचे चित्र आहे. महत्त्वाच्या पोस्टिंगकरिता लाखोंची बोली लावण्यात येत असल्याची माहिती आहे. गृह, महसूल, वन, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण हे विभाग सध्या अव्वलस्थानी असल्याचे दिसून येते. बदलीसाठी मंत्रालयात गर्दी वाढलेली असताना अनेक अधिकारी विनारजा घेऊन राजरोसपणे मंत्रालयात फिरत असल्याचे चित्र आहे.
 

Web Title: The state government changed the law itself for transfers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.