माल वाहतूकदारांचा संप मिटला अन् आता भाजीपाल्याचे दर दामदुप्पट करून गेला!
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 3, 2024 07:05 PM2024-01-03T19:05:05+5:302024-01-03T19:05:30+5:30
भाजीबाजारात ४८ तासांपासून थांबली अन्य जिल्ह्यांसह परराज्यातील आवक
गजानन मोहोड, अमरावती: माल वाहतूकदारांचा संप आता मिटला असला तरी ४८ तासांपासून येथील भाजीमार्केटमध्ये अन्य जिल्ह्यासह परराज्यातील भाज्यांची आवक थांबलेली आहे. या दरम्यान स्थानिक भाजीपाल्यावरच जोर असल्याने ठोक बाजारात दर कडाडले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात तर त्याच्या दामदुप्पट भावाने मंगळवारपासून विक्री होत आहे.
बाजार समितीच्या येथील भाजीमार्केटमध्ये मंगळवारी अन्य जिल्ह्यांसह परराज्यातून आवक झालेली नाही. मंगळवारी रात्री जळगाव येथून बटाटे व कांद्याचे चार ट्रक आलेले आहेत. मात्र, मध्य प्रदेशातून मटर व राजस्थानमधून गाजर याची आवक झालेली नाही. त्यामुळे बटाटे, लसूण व अद्रक चांगलेच कडाडले आहेत.
बुधवारी, टोमॅटो, लसन, अद्रक, कोबी, पत्ता कोबी, गवार, चवळी, ढेमसे, सिमला मिरची, कोहळे, भेंडी, हिरवा वाटाणा व अन्य भाज्यांचे ४० ते ८० रुपये किलोच्या दरम्यान दर होते. दारावर विक्री होणाऱ्या गाड्यांवर त्यापेक्षा अधिक भावाने भाजीपाला विकला गेला. दरम्यान, आता संप मिटला असला तरी गुरुवारी भाजीपाल्याचे लिलाव होत नसल्याने दर चढेच राहणार आहेत व शुक्रवारी काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे एकंदर चित्र आहे.