राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या चमूने आदिवासींचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या
By गणेश वासनिक | Published: October 11, 2024 12:44 PM2024-10-11T12:44:18+5:302024-10-11T12:46:37+5:30
Amravati : शासकीय शाळा, वसतिगृहांना भेटी; आदिवासी विद्यार्थ्यांसाेबत संवाद, सिकलसेल तपासणी शिबिरात उपस्थिती
अमरावती : दिल्ली येथील राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या चमूने ७ व ८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा केला. यात आदिवासींचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. यावेळी शासकीय शाळा, वसतिगृहांना भेटी देताना आदिवासी विद्यार्थ्यांसाेबत संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण हे मजबूत असण्यासाठी सर्वतोपरी उपाययाेजना करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले. दरम्यान ‘एक पेड मेरे मां के नाम’अंतर्गत वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. मोर्शी, धारणी व अमरावती येथे या चमूने आदिवासींसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला, हे विशेष. या चमूत राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य व सदस्य राजीव सक्सेना यांचा समावेश होता. त्यांच्यासमवेत अध्यक्षांचे स्वीय सचिव अंकित सेन, वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे, वरिष्ठ अन्वेषक अमृतलाल प्रजापती आदी दौऱ्यावर होते. जिल्हा आरोग्य विभाग व तालुका आरोग्य विभागाच्यावतीने मोर्शी येथील शासकीय आयटीआयमध्ये आयोजित सिकलसेल तपासणी शिबिराचे उद्घाटन आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी व धारणी येथील प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आयोगाने वनरक्षक समिती, वनाधिकारी हितग्राही समिती, पेसा समिती, स्थानिक आदिवासी जनता व लोकप्रतिनिधींसोबत जनसंवाद साधला. त्यानंतर धारणी, चिखलदरा व मोर्शी परिसरातून आलेल्या वनरक्षा समितीचे सदस्य, वनहितग्राही सदस्य, पेसा समिती सदस्य, आदिवासी तथा लोकप्रतिनिधींसोबत आयोगाने संवाद साधला. येथील विमलाबाई देशमुख सभागृहात आदिवासी वसतिगृहाचे विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या युवा संवाद कार्यक्रमातून राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनी मुलांच्या मनातील भावना जाणून घेतल्या. यावेळी अमरावतीचे एटीसी जितेंद्र चौधरी, धारणीच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांची उपस्थिती होती. गोवर्धन मुंडे प्रास्ताविक तर जवाहर गाढवे यांनी संचालन केले. यावेळी उपायुक्त जागृती कुमरे, वरिष्ठ संशोधन अधिकारी प्रीती तेलखेडे, पुसद येथील प्रकल्प अधिकारी अमोल मेंतकर, धारणीचे सहायक प्रकल्प अधिकारी राहुल ठोंबरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांंचा आढावा आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनी घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अंतरसिंह आर्य यांचा स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. दरम्यान, आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजना व अंमलबजावणीबाबत आयोगाने समाधान व्यक्त केले.