पाठपुस्तके आलेत अन् सहा तालुक्यापर्यंत पोहोचती झाले
By जितेंद्र दखने | Published: May 18, 2024 06:40 PM2024-05-18T18:40:17+5:302024-05-18T18:40:42+5:30
Amravati : विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तक संच
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुलांना यावर्षीही मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात येऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी १ लाख ९० हजार ५६५ मुलांना मोफत पुस्तके दिली जाणार आहे. ही पाठपुस्तके पाठ्यपुस्तकालयात आलीत अन् आता तालुक्याकडे रवाना करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
नवीन शैक्षणिक सत्र २०२४-२५ येत्या १ जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यावर भर दिल्या जात आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी अनुदानित शाळांचा, अंशत: अनुदानित शाळांचा मोफत पाठ्यपुस्तक योजनेत समावेश केला आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील १४ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वरील शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीमधील १ लाख १८ हजार ९७९ तर सहावी ते आठवी मधील ७१ हजार ५८६ अशा एकूण १ लाख ९० हजार ५६५ विद्यार्थ्यासाठी मोफत पाठपुस्तके येथील पाठ्यपुस्तकालयात दाखल झालेली आहेत. या ठिकाणाहून ही पुस्तके जिल्ह्यातील अमरावती,भातकुली,धारणी,चांदुर रेल्वे,धामनगांव रेल्वे आणि अंजनगाव सुजी या सहा तालुकास्तरावर पाठविली आहेत. तर उर्वरित ८ तालुक्यात लवकरच पाठपुस्तके पोहोचविली जाणार आहेत. तालुकास्तरावरून संबंधित शाळेत विद्यार्थ्यासाठी पुस्तकांचे संच नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. येत्या १ जुलै रोजी शाळा उघडणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याना पाठपुस्तके वितरीत केले जाणार आहेत.
इयत्ता पहिली ते आठवीसाठी युडायस पटसंख्येनुसार ऑनलाइन पद्धतीने पाठ्यपुस्तकांची मागणी प्रत्येक तालुकास्तरावरून करण्यात आली होती. १ जुलैपासून शाळा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. बालभारती भवन अमरावती येथे पुस्तके प्राप्त झाली असून, येथून पाठ्यपुस्तके वितरित केले जात आहे.
संगीता सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी