ठाणेदारांनीच दडपले रेट्याखेडा अंधश्रद्धा प्रकरण; ७७ वर्षीय वृद्धेला काळ फासत काढली होती धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:19 IST2025-01-23T12:18:23+5:302025-01-23T12:19:18+5:30

Amravati : आमदारांनी दिली होती वृद्धेची धिंड निघाल्याची माहिती, सुन्न झाले गाव

The Thanedar suppressed the Retyakheda superstition case; The 77-year-old woman was tortured | ठाणेदारांनीच दडपले रेट्याखेडा अंधश्रद्धा प्रकरण; ७७ वर्षीय वृद्धेला काळ फासत काढली होती धिंड

The Thanedar suppressed the Retyakheda superstition case; The 77-year-old woman was tortured

नरेंद्र जावरे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
चिखलदरा (अमरावती) :
तालुक्यातील रेट्याखेडा येथील वृद्धेची धिंड काढण्याचा डोके सुन्न करणारा प्रकार मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी खुद्द ठाणेदाराला सांगून स्वतः चौकशी व तत्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु, ठाणेदार व जमादाराने हा प्रकारच दडपण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आता तक्रार पाठविण्यात आली आहे.


रेट्याखेडा येथे काळमी शेलूकर या ७७ वर्षीय आदिवासी वयोवृद्ध महिलेची गावातून तोंडाला काळे फासून धिंड काढली गेली. अमानवीय आणि निंदनीय अशा या घटनाक्रमाचा आँखो देखा हाल वृद्धेचा नातू आणि ग्रामपंचायत सदस्य सखाराम सुभेलाल शेलूकर यांनी भाजपचे विधानसभा प्रमुख शिवा काकड यांच्यामार्फत मेळघाट मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांच्या पुढ्यात कथन केला व न्यायाची मागणी केली. आमदार काळे यांनी तत्काळ या घटनेची दखल घेत चिखलदराचे ठाणेदार आनंद पिदुरकर यांना फोनवर कळविले. जमादारालासुद्धा या घटनेची माहिती दिली. स्वतः घटनास्थळी जाण्याचे आणि निर्दोष असलेल्या एकाही आदिवासीला हात न लावता केवळ दोषींवर कारवाईचे निर्देश दिले. परंतु, ठाणेदार व जमादाराने पूर्णतः दुर्लक्ष केले. एकंदर हे प्रकरणच दडपण्याचा प्रयत्न ठाणेदार व जमादाराने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पोलिस पीडिताला वाचविण्यासाठी पाठविले की त्यावेळी आर्थिक व्यवहार झाला, याची चर्चा आता रंगली आहे. 


तो सहा दिवस झोपलाच नाही! 

  • पोलिस पाटील तथा तोच रोजगार सेवक असलेला बाबू जामूनकर गावात हुकूमशहासारखा वागत होता. त्यामुळे कोणीही त्याच्याविरुद्ध 'ब्र'ही काढायला तयार नाही. रेट्याखेडा येथे 'लोकमत'ने घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली. अनेकांशी चर्चा केली. आमदारांपर्यंत पोहोचलेला सखाराम शेलूकर तर सहा दिवस झोपलाच नाही
  • डोळ्यांपुढे सतत त्याच्या आजीचे काढलेले धिंडवडे, त्याचे दृश्य तरळत होते. यादरम्यान लोकांशी बोलताना त्याला शब्द सुचत नव्हते. त्याच्या डोळ्यांतून अश्रू सतत पाझरत होते. त्याने अखेर आ. काळे यांची भेट घेतली. आमदारांनी माझ्यासमोर ठाणेदाराला फोन लावून कारवाईचे निर्देश दिल्याचे 'लोकमत'शी बोलताना सखाराम शेलूकरने सांगितले. थंडबस्त्यात गेलेले हे प्रकरण उघडकीस आणून 'लोकमत'ने अन्यायाला वाचा फोडल्याचे तो बोलत होता.


"ठाणेदार आनंद पिदुरकर व जमादाराला तत्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी व योग्य कारवाई करण्याचे आपण स्वतः आदेश दिले. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच सगळा घटनाक्रम पुढे आला. परंतु, ठाणेदार, जमादार यांनी दुर्लक्ष केले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करण्यात आली आहे." 
- केवलराम काळे, आमदार, मेळघाट


"माझ्या आजीवर व माझ्या परिवारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या तंद्रीत सहा दिवस झोपच नाहीशी झाली. अखेर आमदार केवळराम काळे यांची भेट घेतली. तातडीने न्याय मिळेल, ही अपेक्षा होती. परंतु, प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न झाला." 
- सखाराम शेलूकर, ग्रामपंचायत सदस्य, रायपूर

"रेट्याखेडा येथील घटनेबाबात ५ जानेवारी रोजी आ. केवलराम काळे यांनी फोनवर माहिती दिली. तथापि, त्यामध्ये परिपूर्ण वर्णन नव्हते." 
- आनंद पिदुरकर, ठाणेदार, चिखलदरा

Web Title: The Thanedar suppressed the Retyakheda superstition case; The 77-year-old woman was tortured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.