काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला
By प्रदीप भाकरे | Published: August 19, 2023 05:14 PM2023-08-19T17:14:24+5:302023-08-19T17:14:56+5:30
चोरट्यासह साथीदाराला अटक, रोख दीड लाखांसह २.६२ लाखांचा ऐवज जप्त
अमरावती : कुठलाही कामधंदा न करता पैशाची उधळण करीत असलेल्या तरूण आरोपी पोलिसांना हेरला. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्यासह त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांच्याकडून २.६२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे व १.४८ लाख रुपये रोख असा ऐवज हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट एकने १९ ऑगस्ट रोजी ही यशस्वी कारवाई केली.
शकील खान शफी खान (१९) व सैय्यद तनवीर सैय्यद आसिफ (२१, दोघेही रा. रहमतनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चांगापूर येथील शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या आकाश अग्रवाल यांच्या घरातून ४ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे व रोख चोरीला गेली होती. गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंद त्या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना शकील खान (१९) हा कुठलाही कामधंदा करत नाही, मात्र त्याचे शौक उच्चदर्जाचे असल्याचे व तो पैशाची उधळण करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्या माहितीवरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सहकारी सै. तनवीर याच्या साथीने ती चोरी केल्याची कबुली दिली.
त्या घटनेतील ४ लाख ५ हजारांपैकी २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालजप्त करण्यात आला. त्या दोघांनी तीन दिवसांपुर्वी झालेल्या अळणगाव पुनर्वसन येथील आदेश दुर्गे यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. त्या घटनेतील १.४८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आला. दोघांनाही गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले, सहायक पोलीस निरिक्षक मनीष वाकोडे व सायबरचे सहायक पोलीस निरिक्षक कासार,पोहेकाॅ राजुआप्पा बाहेनकर, फिरोजखान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुधडे यांनी केली.