अमरावती जिल्ह्यात साजरा होतो आदिवासींचा पारंपारिक गळ महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 08:00 AM2023-03-15T08:00:00+5:302023-03-15T08:00:11+5:30

Amravati News अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील आदिवासीबहुल भागात होळीला गळ लावण्याची परंपरा आजही कायम आहे.

The traditional festival of tribals is celebrated in Amravati district | अमरावती जिल्ह्यात साजरा होतो आदिवासींचा पारंपारिक गळ महोत्सव

अमरावती जिल्ह्यात साजरा होतो आदिवासींचा पारंपारिक गळ महोत्सव

googlenewsNext

अमरावतीः जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील आदिवासीबहुल भागात होळीला गळ लावण्याची परंपरा आजही कायम आहे. मध्य प्रदेशाच्या सीमेलगत वाई, पुसली, सातनूर आदी बरीच आदिवासीबहुल खेडे आहेत. या आदिवासी समाजातील होळी हा सण महत्त्वाचा मानला जातो. 

सातनूर येथे गेल्या शेकडो वर्षांपासून भुमका गळी लावण्याची प्रथा आजही कायम आहे. शेंदुरजनाघाटपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सातनूर या आदिवासी गावात रंगपंचमीच्या दिवशी गळ भरतो. अर्थात यादिवशी मेघनाथाची पूजा केल्या जाते.

गळ म्हणजे एक २५ फूट उंचीचा उभा खांब जमिनीत पक्का मजबूत असतो तर एक आडवा १० फुटांचा खांब जोडल्या जातो. पूजाअर्चा करून भुमका या आडव्या खांबाला बांधला जातो. वाजंत्रीच्या तालावर पाच फेरे फिरवले जातात. अडीच फेरे घड्याळाच्या दिशेने तर अडीच फेरे विरुद्ध दिशेने असे पाच फेरे पूर्ण करतात. विशेष म्हणजे परंपरेनुसार सिरसाम कुटुंब ठरले आहे. पुढे त्याचे वारस ही विधी पार पाडतात. हा गळ आदिवासी बाधवांचे दैवत मेघनाथ यांच्या नावाने साजरा करतात. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली जाते.

गळाला बांधले जाणारे सातनूर येथील कमलाकर रामकिसन सिरसाम सांगतात, माझे आजोबा चंद्रभान यांच्या पूर्वीपासून गळ यात्रा सुरू असून वडील रामकिसन शिरसाम गळाला बांधले जायचे. हा वारसा सिरसाम परिवारकडेच आहे. शेकडो वर्षापासून सुरू असलेला गळ आजच्या संगणक युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. कमलाकर सिरसाम यांनी पुढे सांगितले गळाला फिरवणारा बाबुराव आणि या पूर्वी रामराव हे फिरवायचे. आता वय झाल्याने मनोहर कुमरे व सुरेश धुर्वे हे गळाला बांधण्यास व फिरवणारे आहे.

या कामाचा विडा देण्यात येताे तर गळाला बांधलेल्या व्यक्तीच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्यावर तेथून सोडून खाली उतरल्यावर आशीर्वाद घेतले जातात. गळाला बांधून फिरवणे, फिरवण्याची परंपरा अजूनही सुरू असून पंचमीच्या दिवशी सातनूरला मोठी यात्रा भरते. आदिवासी बांधवांचा हा गळ महोत्सव पुसली येथे व सातनूर या दोन्ही गावात साजरा झाला. पुसली येथे धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी तर सातनूर येथे रंगपंचमीला हा गळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती.

Web Title: The traditional festival of tribals is celebrated in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.