ट्रान्सफार्मर जळाले, बत्ती गुल; मोबाईलच्या उजेडात रुग्णांवर उपचार
By उज्वल भालेकर | Published: March 25, 2024 09:32 PM2024-03-25T21:32:57+5:302024-03-25T21:34:40+5:30
रुग्णांचे हाल, मोबाईलच्या उजेडात सुरू आहेत उपचार, आयसीयू मध्येही अंधार
अमरावतीः जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील ट्रान्सफार्मर सोमवारी अचानक जळाल्याने मागील तीन तासापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. शॉकसर्किट झाल्याने ट्रान्सफार्मर जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आयसीयू, बालरोग विभाग, बाह्यरुग्ण विभाग तसेच इतर सर्वच वार्डात विज नाही. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही नाहकत्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे स्वतः रुग्णालयात हजर राहून तातडीने दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना देत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपुऱ्या सोयीसुविधेमुळे रुग्ण तसेच नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच सोमवारी सायंकाळी सहा वाजता अचानक शॉकसर्किट मुळे ट्रान्सफार्मरने पेट घेतला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचारांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. एकतासाच्या प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु तोपर्यत ट्रान्सफार्मर पूर्णपणे खाक झाले होते. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात काळाकुट्ट अंधार पसरला आहे. महत्वाचे म्हणजे येथील आयसीयू विभागातही अंधार पसरला आहे. बाह्र रुग्ण विभागात अपघातग्रस्त रुग्णांवर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार सुरू आहे. येथील जनरेटर देखील बंद असल्याने रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.