ठाकरे गटाने खड्डेमय रस्त्यावर लावले ‘फडतूस मार्ग’ असे फलक; पालकमंत्र्याचा केला निषेध
By उज्वल भालेकर | Published: July 17, 2023 06:02 PM2023-07-17T18:02:01+5:302023-07-17T18:04:16+5:30
शहरातील विद्युतभवन येथे सरकार विरोधात आंदोलन,
अमरावती : शहरातील कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल ते पंचवटी मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सोमवारी उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने विद्युत भवन समोर आंदोलन करून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या मार्गाचे ‘फडतूस मार्ग’ असे नामकरण करत तसे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आले.
पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांची चाळण झालेली आहे. अशाच प्रकारची रस्त्याची दुर्दशा ही कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल ते पंचवटी या मार्गाची देखील झाली आहे. या रस्त्यावर विद्युत भवन तसेच शाळा महाविद्यालये असून रोज या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नियमित वाहतूकही सुरु असते. परंतु रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्याच बरोबर हा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय तसेच अनेक शासकीय कार्यालयांकडे जाणारा मुख्य मार्ग आहे.
या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करुनही प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पालकमंत्री पद साेडून द्यावे, अन्यथा शहरातील रस्त्याची पाहणी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना गटाने केली आहे. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फडतूस मार्ग असे बोर्ड लावून राज्य शासनाचा निषेध नोंदविला. हे आंदोलन जिल्हा प्रमुख सुनील खराटे, माजी नगरसेवक प्रदीप बाजड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.