प्रतीक्षा संपली, अखेर तीन वर्षानंतर एमपीएससीच्या ४२९ अभियंत्यांची नियुक्ती
By गणेश वासनिक | Published: October 21, 2023 04:53 PM2023-10-21T16:53:23+5:302023-10-21T16:54:42+5:30
राज्याच्या जलसंपदा विभागाला उशीरा आली जाग, २०१९ मध्ये झाली होती परीक्षा
चांदूर बाजार (अमरावती) : राज्याच्या जलसंपदा विभागाने गत तीन वर्षांपूर्वी एमपीएससीमार्फत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, तीन वर्षाच्या कालावधी होऊनही या अभियंत्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. परिणामी आमदार बच्चू कडू यांनी जलसंपदा मंत्रालयात गाठून पत्रव्यवहार केला. त्यांच्या स्टाईने ‘प्रहार’ देखील केला. आंदोलनाची धमकी दिली. त्यामुळे जलसंपदा विभागाने शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात ४२९ उत्तीर्ण विद्यार्थ्याची अभियंतापदी नियुक्ती केली आहे.
गेल्या तीन वर्षापासून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही ४२९ विद्यार्थ्यांना नियुक्त पत्र मिळाले नव्हते. या विद्यार्थ्याना भविष्य अधांतरी असल्याची भावना निर्माण झाली होती. शासन-प्रशासन स्तरावर या परीक्षार्थींनी पत्र व्यवहार केला. पण ‘मंत्रालयाचे काम, वर्षांनुवर्षे थांब’ असे चालत असल्याचा अनुभव या विद्यार्थ्याना आला. दरम्यान काही विद्यार्थी आत्महत्येचा विचार करीत होते. काहींचे लग्न जुळत नव्हते. हे विद्यार्थी फार अडचणीत होते.
दरम्यान गत काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यानी आमदार बच्चू कडू यांची भेट घेवून आपबीती कथन केली. तसेच त्यांना नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानंतर आ. कडू यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जलसंपदा मंत्रालय गाठले आणि अभियंतापदी नियुक्ती करण्याबाबत निर्वाणीचा इशारा दिला. प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने आमदार कडू यांनी १४ नोव्हेंबर २०२३ रोजी उपोषणाची नोटीस देखील दिली होती. अखेर २० ऑक्टोबर २०२३ रोजी जलसंपदा विभागाने शासन निर्णय जारी करीत ४९५ पात्र उमेदवारापैकी ४२९ उमेदवारांना पहिल्या टप्प्यात नियुक्ती केली आहे.
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अतिशय श्रमाने अभ्यास केला आणि एमपीएसची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, नियुक्तीसाठी तीन ते चार वर्ष लागत असेल तर ही बाब अतिशय चिंतनीय आहे. हे अन्यायग्रस्त विद्यार्थी माझ्याकडे आले. त्यांनी कैफियत मांडली. लोकप्रतिनिधी म्हणून मी कर्तव्य बजावले. या सर्व विद्यार्थ्याना २० ऑक्टोंबर रोजी नियुक्ती मिळाली, याचे समाधान आहे.
- बच्चू कडू, आमदार तथा राज्यमंत्री