भरधाव एसटी बसचे चाक निखळले, मोठा अनर्थ टळला
By जितेंद्र दखने | Updated: July 31, 2023 21:45 IST2023-07-31T21:44:59+5:302023-07-31T21:45:23+5:30
अच्युत महाराज हार्ट हाॅस्पिटल समोरील घटना

भरधाव एसटी बसचे चाक निखळले, मोठा अनर्थ टळला
जितेंद्र दखने, अमरावती : अमरावती मध्यवर्ती बसस्थानकामधून सकाळी मार्डी मार्गे बोडणा गावाकडे येणाऱ्या एसटी बसचे समोरील डाव्या बाजूचे चाक अचानक निखळल्याची घटना अच्युत महाराज हार्ट हाॅस्पिटलसमोर घडली. मात्र, चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. प्रवासी वाहतुकीसाठी पाठविण्यात येत असलेल्या काही बसगाड्या पूर्णत: भंगार झालेल्या असून एसटी महामंडळ बस न तपासताच त्या पाठविल्या जातात. त्यामुळे एसटी बस रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मनात महामंडळाच्या बसविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
अमरावतीहून ३१ जुलै रोजी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास मार्डी मार्गे बोडणा गावाकडे शालेय विद्यार्थी फेरीसाठी जाणाऱ्या बस(एमएच १३ सीए ६८६०) चे पुढील डाव्या बाजूचे चाक हब बेरिंग स्वीच गरम होऊन फुटल्याने निखळले. चालकाच्या समयसूचतेमुळे अपघात टळला. सुदैवाने विद्यार्थी बस फेरी असल्याने बोडणा गावाकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्दल यंत्र अभियंता धनाड यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश आगारप्रमुखांना दिले असून दोषींवर कारवाईच्या सूचना दिल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.