भुसावळ विभागात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्य युद्धस्तरावर, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना
By गणेश वासनिक | Published: October 1, 2023 02:27 PM2023-10-01T14:27:43+5:302023-10-01T14:28:52+5:30
मनमाड-जळगाव-भुसावळ नवीन तिसरी लाईन; १३६०.१६ कोटींचा खर्च अपेक्षित,
अमरावती: मध्य रेल्वे भुसावळ विभागात मनमाड-जळगाव-भुसावळ या दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्य युद्धस्तरावर सुरू
आहे. या तिसऱ्या मार्गामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत होणार असून, मालगाडी वाहतुकीला नवा मार्ग मिळणार आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना टाळता येणार असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई मध्य रेल्वे विभागाने नागपूर ते मुंबई या दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्याअनुषंगाने नागपूर ते वर्धा या दरम्यान काही प्रमाणात तिसऱ्या मार्गाचे काम झाले आहे. काही ठिकाणी टप्प्या-टप्प्याने होत आहे. मनमाड-जळगाव-भुसावळ या दरम्यान एकूण १८३.९५ किमी लांबीचा तिसरा रेल्वे मार्ग टाकला जात आहे. त्याकरिता १३६०.१६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत १२८६.७५ कोटी खर्च करण्यात आले आहे. एकूण कामांची भौतिक प्रगती ८० टक्के एवढी झालीआहे.
या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी आतापर्यंत २८.१९/३७.०८ हेक्टर जमीन संपादन पूर्ण झाले आहे. चाळीसगाव-पिंपरखेड या ३१.७९ किमी लांबीचा मार्ग या वर्षात पूर्ण होण्याचे शक्यता आहे. पाचोरा -चाळीसगाव आणि नांदगाव -पिंपरखेड या दरम्यान ५५.३४ किमी लांबीचा तिसरा रेल्वे मार्गाचे कार्य प्रगतीपथावर आहे.
९६.८१ किमी लांबीचे पूर्ण झालेले विभाग
भुसावळ - जळगाव
जळगाव - पाचोरा
मनमाड - नांदगाव
आतापर्यंत पूर्ण झालेली कामे
माती कामे, ब्लँकेटिंग, प्रमुख पूल, छोटे पूल, स्टेशन इमारती, ट्रॅक लिंकिंग, गिट्टी पुरवठा, ओएचई फाउंडेशन, मास्ट इरेक्शन, विद्युतीकरण- ट्रॅकच्या कामासह एकाच वेळी प्रगतीपथावर असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी मानसपुरे यांनी सांगितले.