‘चलती रहेगी दुनिया हमारे बगैर भी...’, स्टेटस ठेवून युवकाची मेंढीखेडा धरणात जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 12:02 PM2022-10-18T12:02:48+5:302022-10-18T12:05:28+5:30
मोबाइलवरील त्याचे स्टेटस व्हायरल
वरूड/लोणी (अमरावती) : बाराव्या वर्गात शिकत असलेल्या लोणी येथील १९ वर्षीय युवकाने नजीकच्या मेंढीखेडा धरणात उडी घेऊन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. आता मोबाइलवरील त्याचे स्टेटस व्हायरल झाले आहे. ‘चलती रहेगी दुनिया हमारे बगैर भी, एक तारा टुट जानेसे आसमान खाली नहीं होता’ असा मजकूर त्यावर आहे.
मृत युवकाचे नाव सिद्धांत दिलीप दुर्गे (१९, रा. लोणी) असे आहे. तो अपर वर्धा कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होता. तो १३ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊपासून आजोबांकडे दिवाळी साफसफाईचे काम करीत होता. यानंतर रात्री ८ पर्यंत त्यांच्या घरी आराम केला. त्यानंतर मात्र तो अचानक घरून निघून गेला. यानंतर रात्री उशिरापर्यंत परत आला नाही. शोधाशोध केली असता, शोध लागला नाही.
१४ ऑक्टोबरला मेंढीखेडा धरणात त्याची चप्पल आणि डोके पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दरम्यानच्या काळात त्याचे स्टेटस व्हायरल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास बेनोडा ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणपत पुपुलवार, जमादार सुभाष शिरभातेसह बेनोडा पोलीस करीत आहेत.