अमरावती जिल्ह्यातील वायगावच्या प्रख्यात गणपती मंदिरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 09:04 PM2019-01-17T21:04:27+5:302019-01-17T21:04:56+5:30
नवसाला पावणारे वायगावचे गणपती विभागात प्रसिद्ध आहे. चोरांनी बुधवारी मध्यरात्री प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून दोन किलोंचा चांदीचा साज व दानपेटी फोडून सुमारे २० हजारांची रोख लंपास केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवसाला पावणारे वायगावचे गणपती विभागात प्रसिद्ध आहे. तेथील मंदिराला चोरांनी बुधवारी मध्यरात्री लक्ष्य केले. प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून गणपती मूर्तीच्या बाजूचा दोन किलोंचा चांदीचा साज व दानपेटी फोडून सुमारे २० हजारांची रोख लंपास केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
वायगाव येथील श्रीक्षेत्र गणपतीचे मंदिर राज्यभरात सुप्रसिद्ध आहे. मंदिराच्या छत सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मजुरांचा वावर आहे. बुधवारी सायंकाळी कामावरील मजूर निघून गेल्यानंतर रात्रीच्या विधीवत आरतीनंतर पुजाऱ्यांनी मंदिर बंद केले. मंदिराच्या मुख्यद्वारासह दुसऱ्या बाजूला असलेल्या लोखंडी चॅनेल गेटलाही पुजाºयांनी कुलूप लावले. गुरुवारी सकाळी पुजारी शंभुनाथ पांडे व वैभव महाराज इंगोले यांनी मंदिरात प्रवेश केला असता, त्यांना चॅनेल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. दानपेटीचे कुलूप तोडून रोख लंपास केल्याचे आढळून आले. पुजाºयांनी या घटनेची माहिती तत्काळ श्री सिद्धी विनायक गणपती संस्थाचे अध्यक्ष विलास इंगोले यांना दिली. त्यांनी वलगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, वलगावचे ठाणेदार पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी पंचनामा केला असता, मंदिराच्या गाभाºयातील दोन किलो वजनाचा चांदीचा पत्रा व दानपेटीतील सुमारे २५ हजार रुपये लंपास केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्तांनी भेट देऊन पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. या घटनेच्या अनुषंगाने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनीही पाचारण केले गेले. पोलिसांनी संस्थानचे अध्यक्ष विलास इंगोले यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
वायगावच्या गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली आहे. तेथे पीओपीचे काम सुरू आहे. तेथील कामगारांची चौकशी सुरू आहे.
- रणजीत देसाई,
सहायक पोलीस आयुक्त
मध्यवस्तीत मंदिर
अडीच हजार लोकवस्तीच्या वायगावात मध्यवस्तीत हे पुरातन गणपती मंदिर आहे. या मंदिराच्या आजूबाजूला लोकवस्ती असल्यामुळे दिवसभर भक्तांची वर्दळ असते. याशिवाय विविध जिल्ह्यांतील भक्तांचे आवागमन सुरूच असते. अशा स्थितीत मंदिरात चोरी झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
पीओपीचे काम सुरू असल्याने दोन दिवसांपूर्वी कामाच्या गरजेनुसार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले. त्यामुळे ही चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद होऊ शकली नाही.
कामगारांची चौकशी
या चोरी प्रकरणात संशयाची सुई कामगारांवर आहे. पोलिसांनी काही कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सिद्धीविनायक मंदिरात २८ किलो वजनाचे सिंहासन रिपिटने फिट केले होते. त्यातील २ किलोंचा पत्रा कापून नेला. दान पेटीतील अंदाडे २५ हजार रुपये नेले. कळस आणि काही मौल्यवान वस्तू रोज पुजारी काढून ठेवत होते. त्यामुळे कळस वाचले.
- विलास इंगोले,
अध्यक्ष सिद्धीविनायक मंदिर संस्थान, वायगाव