बेनोडा शिवारातून संत्र्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:25+5:302021-02-07T04:12:25+5:30
बेनोडा शहीद : बेनोडा शिवारातील मनीष गोहाड यांच्या शेतातून चोरांनी मृग बहराचा तोडणीस आलेला अंदाजे ७० क्रेट संत्री लंपास ...
बेनोडा शहीद : बेनोडा शिवारातील मनीष गोहाड यांच्या शेतातून चोरांनी मृग बहराचा तोडणीस आलेला अंदाजे ७० क्रेट संत्री लंपास केल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी सकाळी उघड झाली. मनीष गोहाड यांच्या अमरावती-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या बगीचातील मृग बहराची संत्री त्यांनी अब्दुल कलाम नामक व्यापाऱ्याला १८ लाख रुपयांत विकला. व्यापाऱ्याने तेथे एक सोकारीसुद्धा बसविला आहे.
रात्रीच्या वेळी सोकारी गाढ झोपेत असताना संत्राचोरांनी मालवाहू वाहनातून संत्र्याचे क्रेट चोरून नेल्याचे टायरच्या निशानावरून ओळखायला आले. पाच-सहा वर्षांपासून संत्राउत्पादकांना दरवर्षी संकटांची मालिका छळते आहे. सततच्या अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करता-करता जेरीस आलेल्या बळीराजाची या चोरीच्या घटनांनी झोप उडवली आहे. आधीच अत्यल्प उत्पादन, त्यात या चोरी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार एस.सी. भोसले आणि सुदाम साबळे करीत आहेत.
--------------