‘त्यांचे’ घराचे स्वप्न अपूर्णच !
By Admin | Published: April 20, 2017 12:02 AM2017-04-20T00:02:23+5:302017-04-20T00:02:23+5:30
सैन्य दलात सेवा देत असतानाच स्वत:च्या कुटुंबासाठी आपल्या राहत्या गावी घराचे बांधकाम करणाऱ्या सुभेदार महेंद्र खांडेकर यांच्या आकस्मिक मृत्युमुळे ....
चटका लावणारी ‘एक्झिट’ : सैनिकाचा आकस्मिक मृत्यू, दर्यापुरात शोककळा
दर्यापूर : सैन्य दलात सेवा देत असतानाच स्वत:च्या कुटुंबासाठी आपल्या राहत्या गावी घराचे बांधकाम करणाऱ्या सुभेदार महेंद्र खांडेकर यांच्या आकस्मिक मृत्युमुळे त्यांच्या कुटुंंबावर शोककळा पसरली आहे. मे महिन्यात घराच्या बांधकामाचे अवलोकन करण्याकरिता ते दर्यापूरला येणार होते. तसे त्यांनी पत्नीला आदल्या दिवशीच दूरध्वनीवरून कळविले होते. मात्र, नव्या घरकुलाचे बांधकाम आणि डोळ्यांतील स्वप्ने अर्धवट सोडून ईहलोकाची यात्रा संपविणाऱ्या महेंद्र यांची ‘एक्झिट’ जीवाला चटका लावणारी ठरली आहे.
येथील मूळ रहिवासी महेंद्र ओंकारराम खांडेकर हे रांची येथे सैन्यदलात सुभेदार म्हणून कार्यरत होते. सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना दर्यापुरातच स्थायिक व्हायचे असल्याने त्यांनी येथे घराचे बांधकाम काढले होते. पत्नी संगिता, अकरा वर्षांचा वैभव व नऊ वर्षांच्या वैष्णवीसह नव्या घरात सुखासमाधानाचे आयुष्य जगण्याची स्वप्ने ते पाहात होते. त्यांची दोन्ही मुले येथील प्रबोधन विद्यालयात शिकत आहेत. घराच्या बांधकामासाठी दोन महिन्यांपूर्वी ते येथे आले होते. बांधकाम मार्गी लाऊन ते पुन्हा नोकरीवर रुजू झाले. मे महिन्यात बांधकामाचा आढावा घेण्याकरिता ते दर्यापूरला येणार होते. मृत्युच्या आदल्या रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी फोन करून पत्नीकडे सर्वच गोष्टींची विचारपूस केली होती. मे महिन्यात महेंद्र गावी येणार असल्याने पत्नीला आनंद झाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या कुटुंबावर कुठाराघात झाला. पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीत. मुलांना काय झाले तेच कळत नाही. संपूर्ण गाव महेंद्र खांडेकर यांच्या अकाली निधनाबद्दल हळहळत आहे. त्यांच्या घराकडे पाहून प्रत्येकाला नियतीच्या कठोरपणाची जाणीव होत आहे. (प्