- तर अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:32 PM2019-05-27T12:32:10+5:302019-05-27T12:32:33+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने दिली आहे.
गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने दिली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात यासंदर्भात विद्यापीठ कोणती भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उन्हाळी आणि बॅकलॉग असे अभियांत्रिकीचे दोन लाख पेपरचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी विद्यापीठाकडे आहे. १५ मे पासून मूल्यांकनास प्रारंभ झाले असले तरी महाविद्यालयातून मूल्यांकनासाठी विषय प्राध्यापकांना पाठविण्याची तसदी प्राचार्यांकडून घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी आल्या असताना त्या व्हॅल्युअरअभावी तशाच पडून आहेत. विषय प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केल्याशिवाय पुढील प्रवास करता येत नाही. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने ज्या १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शून्य मूल्यांकन आहे, अशा महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका परीक्षा विभागात स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी कठोर भूमिका घेतली आहे. परिणामी विद्यापीठविरूद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘मूल्यांकन नाही तर उत्तरपत्रिका नाही’ असा आक्रमक पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.
अभियांत्रिकी बॅकलॉगचा निकाल १० दिवसात लागणार
अभियांत्रिकी बॅकलॉग पेपरचे मास्कींग पूर्ण झाले असून, पुढील १० दिवसांत निकाल जाहीर केले जातील, अशी तयारी करण्यात आली आहे. ५० पेपरचे निकाल तयार झाले. अभियांत्रिकी बॅकलॉग विषयाचे पेपर झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत निकाल जाहीर केले जाणार आहे.
१३ अभियांत्रिकी महाविद्यालयांना तंबी
मूल्यांकनासाठी विषय प्राध्यापकांना न पाठविणारे १३ अभियांत्रिकी महाविद्यालये अमरावती विद्यापीठाच्या रडारवर आहेत. यात धामणगाव रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथील भोसला, मानव आणि शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी, चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा येथील राजश्री शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील डॉ. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, खामगाव येथील सिद्धी विनायक अभियांत्रिकी, पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथील जगदंबा अभियांत्रिकी, वाशिम येथील संमती अभियांत्रिकी आणि अमरावती येथील पी.आर. पोटे आर्किटेक्चर अभियांत्रिकीचा समावेश आहे.
शून्य मूल्यांकन असलेल्या १३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मौखिक ताकिद दिली आहे. दोन दिवसांत विषय प्राध्यापकांना मूल्यांकनाकरिता पाठविले नाही तर अशा महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, असे कळविले आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ