- तर भातकुली तहसील कार्यालयाला कुलूप ठोकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:47 AM2019-06-26T01:47:36+5:302019-06-26T01:48:18+5:30
अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.
भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासंदर्भात शासनाचे महसूल व वन विभागाचे अवर सचिव नि.पा. आव्हाड यांनी १५ जून २०१७ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. भातकुली तहसील कार्यालय हे अमरावतीत नव्हे, तर तालुक्याच्या ठिकाणी असावेत, याकरिता रिट याचिका क्रमांक ३९११/२०१७ अन्वये निकाल लागला आहे. तसे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहे. असे असताना राजकीय दबावापोटी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भातकुली तहसील कार्यालय स्थलांतरित झाले नाही. मात्र, ५ जुलै अगोदर तहसील कार्यालय स्थलांतरित झाले नाही, तर कुलूप ठोकले जाईल, असा ईशारा देण्यात आला आहे. सध्या भातकुलीत ग्रामीण रूग्णालय, पोलीस ठाणे, कृषि कार्यालय असताना तहसील कार्यालयाचे स्थलांतरण का नाही, असा सवाल युवा स्वाभिमान पार्टीने उपस्थित केला आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना ३० ते ३५ कि.मी. अंतर गाठून कामानिमित्त अमरावती ये- जा करावी लागते. तहसील कामानिमित्त २०० रुपयांचा भुर्दंड पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेले तहसील कार्यालय स्थलांतरित करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा राजू रोडगे, जीतू दुधाने, मंगेश पाटील, राजू हरणे, रेखा पवार, गिरीश कासट, मयुरी कावरे, जया तेलखंडे, प्रदीप थोरात, पुरूषोत्तम खर्चान, शंकर डोंगरे, श्रीकृष्ण पाटील, आशिष कावरे, नरेंद्र तेलखडे, बाळू मिलखे आदींनी दिला.