-तर तीन दिवसांनी पुन्हा आंदोलन
By admin | Published: August 13, 2016 11:59 PM2016-08-13T23:59:41+5:302016-08-13T23:59:41+5:30
वसतिगृह अधीक्षक, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे,
अमरावती : वसतिगृह अधीक्षक, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, दोषींना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्धही फौजदारी आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे, अशी मागणी लहूजी शक्ती सेनेने एस.पी. कार्यालयावर शनिवारी हल्लाबोल मोर्चा काढून केली.
लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते विदर्भाध्यक्ष रूपेश खडसे यांच्या नेतृत्वात दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले. परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तुफान नारेबाजी करत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर झालेल्या छोटेखानी सभेत मातंग समाज बांधवांनी कमालिचा संताप व्यक्त केला.
पिंपळखुटा येथील आश्रम परिसरात प्रथमेशला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न ज्या पद्धतीने करण्यात आला ती पद्धती नरबळीच्या प्रकाराकडे अंगुली निर्देश करते, असाही दावा जिल्हापोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. अनैसर्गीक कृत्य आणि जादू टोना या दृष्टीने शंका व्यक्त करण्यात आली आहे.
अधिक्षक व्यवस्थापनातील मंडळी आणि दोषी कर्मचारी यांना तात्काळ अटक न केल्यास लहूजी शक्ती सेना जागो जागी हिंसक आंदोलन करेल. तुम्ही अटक करणार नसाल तर चाकू, तलवारी घेवून आम्ही त्यांना कापून काढू अशा तीव्र शब्दात जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलकांनी भावना व्यक्त केल्या.
प्रथमेश बोलू लागल्यावर काय ते कळेल, असे सांगून त्यानंतरच कारवाई करु असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. हा हास्यास्पद प्रकार आहे. घटना घडून आठवडा उलटला. पोलिसांनी स्वबळावर कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. प्रथमेशलाच गुन्हा सांगायचा असेल तर पोलिसांची गरजच काय, असा सवाल आंदोलकांनी एस.पी. कार्यालयासमोरील भाषणात विचारला. यावेळी सिबीआय चौकशीची मागणी करण्यात आली.
आंदोलनात पंकज जाधव, शंकरराव खंडारे, उमेश भुजाडणे, विनोद तिरळे, संतोष वाघमारे, अशोक खंडारे, उत्तमराव भैसने, शिलाताई गायकवाड, दिलीप आमटे, जयकांत स्वर्गे, मनोज गवळी, गौरव गवळी आदी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे आमच्या हृदयात
जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या अनुपस्थितीत उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी निवेदन स्वीकारले. अण्णाभाऊ साठे यांचा जयजयकार करणाऱ्या निवेदनकर्त्यांवर घाडगे भडकले. नारे न लावण्याची तंबी दिली. अण्णाभाऊ आमच्या हृदयात आहेत म्हणून आम्ही त्यांचा जयजयकार केला. यात कुठे कायदा तुटला? ना प्रशासनाविरुद्ध आम्ही नारे दिले ना अपशब्द वापरले, असे बाणेदार उत्तर आंदोलकांनी घाडगे यांना त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात दिल्यावर घाडगे निरुत्तर झाले. आंदोलकांना कक्षात येऊ न देता स्वत: बाहेर आलेल्या घाडगेंना ‘चला, बसून चर्चा करू’, असा निर्णायक आग्रह आंदोलकांनी धरला. अखेर घाडगे आंदोलकांना घेऊन कक्षात गेले. घाडगे यांच्याशी केलेल्या चर्चेअंती आंदोलक असमाधानी होते. घाडगे हे आश्रम व्यवस्थापनाची बाजू घेत आहे, असा आरोप त्यांनी केला.