तर अधिकारी घरी पाठवू
By admin | Published: January 20, 2015 10:30 PM2015-01-20T22:30:17+5:302015-01-20T22:30:17+5:30
महानगरात विना परवानगीने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या मुद्दावरुन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. महापौरांनी तर या विषयावरुन एक,
महापौरांचे निर्देश : अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीचा प्रश्न पेटला
अमरावती : महानगरात विना परवानगीने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या मुद्दावरुन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. महापौरांनी तर या विषयावरुन एक, दोन अधिकाऱ्यांना घरी पाठवावे लागेल, असे निर्देश दिलेत. हा विषय जनविकास- रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड यांनी दमदारपणे सभागृहात मांडला.
महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली मंगळवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहरात उभारल्या जात असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरचा विषय चांगलाच गाजला. प्रकाश बनसोड यांनी हा विषय प्राधान्याने घेण्याच्या सूचना प्रशासनाला सोमवारी झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. मात्र, अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीचा विषय पुढील सभेत घेण्याचा प्रस्ताव येताच प्रकाश बनसोड जाम उखडले. प्री- मिटिीगमध्ये ठरलेले विषय रद्द होत असेल तर कार्यक्रम पत्रिका तोंडावर फेकणार, असे म्हणत बनसोड आक्रमक झालेत.
बडनेऱ्यात एका रात्रीतून अनिधकृत मोबाईल टॉवर उभारणीची किमया करणाऱ्या अभियंत्यांचा नावाचा उल्लेख करुन प्रकाश बनसोड यांनी महापालिकेतील सहायक संचालक नगररचना विभागात सुरु असलेल्या अफलातून कारभाराची चिरफाड केली. हा विषय चांगलाच गाजत असताना अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीतून त्रस्त असलेल्या सदस्यांनी चर्चेत सहभागी होत प्रशासनावर ताशेरे ओढले. चेतन पवार, दिनेश बूब, प्रदीप दंदे, सुनील काळे, जयश्री मोरया, कांचन गे्रसपुंजे, अर्चना इंगोले, सुजाता झाडे, प्रशांत वानखडे, राजू मसराम, निलिमा काळे, प्रदीप बाजड आदींनी अनधिकृत मोबाईल टॉवर, अतिक्रमण विषय यापुढे सर्वसाधारण सभेत येता कामा नये, असे प्रशासनाला आदेशित केले. प्रकाश बनसोड यांनी बडनेऱ्यात ज्या भागात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे, त्याच मालकाने नियमबाह्य रो-हाऊस, सदनिका उभारल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली.