- तर आमचे हात मोकळे; पप्पू पाटलांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:18 AM2017-12-09T00:18:02+5:302017-12-09T00:18:18+5:30
मनसेचे शहरप्रमुख संतोष बद्रे यांच्यावरील हल्ल्यामागे शासकीय जमिनीसंबंधीचा वाद असून, आमदार बच्चू कडू यांनी या विषयात अडसर आणल्यास आमचे हात मोकळे असल्याचा इशारा मनसेचे जिल्हा संघटक मंगेश ऊर्फ पप्पू पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.
अमरावती : मनसेचे शहरप्रमुख संतोष बद्रे यांच्यावरील हल्ल्यामागे शासकीय जमिनीसंबंधीचा वाद असून, आमदार बच्चू कडू यांनी या विषयात अडसर आणल्यास आमचे हात मोकळे असल्याचा इशारा मनसेचे जिल्हा संघटक मंगेश ऊर्फ पप्पू पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.
अचलपूर तालुक्यातील भूगाव येथे शासकीय जागेवरील स्थानिकांचे अतिक्रमण काढून परप्रांतीयांना स्थायिक करण्याचा डाव बच्चू कडू रचत आहेत. त्याविरुद्ध भूगावच्या सरपंचांसह अनेक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन उभारले आहे. शासकीय जमीन हडपणे हा आमदार बच्चू कडू यांचा व्यवसाय असून, भूगावच्या ४५ एकर जागेवर त्यांची वक्रदृष्टी आहे. याविरुद्ध मनसेने आवाज बुलंद केला होता. बच्चू कडू मुंबईत राज ठाकरे यांच्याविरुद्ध बोलले, त्याला या प्रकरणाची किनार आहे, अशी माहिती पप्पू पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.
भूगाववासीयांच्या मागण्या १५ दिवसांत मान्य करवून घेण्याचा मनसेचे संकल्प आहे. या प्रक्रियेत बच्चू कडू यांनी जराही हस्तक्षेप केल्यास आमचे हात मोकळे आहेत, असा इशारा पप्पू पाटील यांनी दिला. बद्रे यांच्यावर भ्याड हल्ला करणाºया तुषार पुंडकर या गुंडावर खुनाचे आरोप आहेत. एकटे बघून भ्याड हल्ला करणे हे शौर्य नाही. बच्चू कडूंच्या भावावर कशा स्वरूपाचे आरोप आहेत, याबाबतचा चिठ्ठा काढला, तर आ.कडूंना तोंडही दाखवायला जागा उरणार नाही, असे आक्रमक वक्तव्य पाटील यांनी केले.
महत्त्वशून्य लोकांबाबत मला बोलायचे नाही. जमिनीबाबत हेच सांगेन की, भटक्या जमातीतील गरजू लोकांना घरे मिळवून देणे इतकाच उद्देश आहे. स्थानिक की परप्रांतीय, याऐवजी ते गरीब आहेत इतकेच मला ठाऊक आहे.
- बच्चू कडू, अपक्ष आमदार