तत्कालीन कुलगुरूंनी ‘आयकर’ माहिती दडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:50 PM2018-08-28T21:50:32+5:302018-08-28T21:50:47+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती दडविली. खेडकरांनी फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये या बाबी नमूद केल्या नाहीत, ही सत्यता माहिती अधिकारातून समोर आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने विद्यापीठाला पत्र पाठवून माहिती मागविली, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती दडविली. खेडकरांनी फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये या बाबी नमूद केल्या नाहीत, ही सत्यता माहिती अधिकारातून समोर आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने विद्यापीठाला पत्र पाठवून माहिती मागविली, हे विशेष.
मोहन खेडकर हे विद्यापीठात २३ फेब्रुवारी २०११ ते २४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान कुलगुरू होते. आयकर विभागाने सुसज्ज कुलगुरू बंगल्यावर खेडकरांनी घेतलेल्या वीज, पाणी, फर्निचर, नोकर-चाकर आदी सुविधांवर खर्चाची माहिती मागविली आहे. वीज, फर्निचर, बागवान,, बंगल्यावर कामगार, घरकामगार, सुरक्षा रक्षक, कायमस्वरूपी कर्मचारी आणि वॉचमन यांच्यासाठी पाच वर्षांत १ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाल्याची आकडेवारी आहे. या खर्चाच्या अनुषंगाने खेडकरांच्या मासिक वेतनात ही रक्कम नमूद होणे नियमावली होती.
सुविधांवरील खर्च नमूद नाही
खेडकरांनी पाच वर्षात सुसज्ज कुलगुरू बंगल्यावर सर्वच सुविधा घेतल्या आहेत.तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी ही माहिती आयकर विभागाला कळविली नाही. आयकर विभागाकडे फॉर्म १६ व १२ बी.ए.मध्ये कर्मचारी वेतन, बंगल्यावर फर्निचरसह अन्य सुविधांवर झालेला खर्च नमूद केला नाही. खेडकरांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाºयांचे वेतन, सुविधांवरील खर्च सादर केलेला नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने माहिती अधिकारातून स्पष्ट केले आहे. खेडकर यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कर्मचारी वेतन, माळी, सफाई कर्मचारी, पाणी, विद्युत, फर्निचर सुविधा, कंत्राटी कर्मचारी आदींचा खर्च १ कोटी ३९ लाख रुपये झाला आहे. यात नियमित कर्मचारी वेतन ७८ लाख ३७ हजार, दैंनदिन कामगार २ लाख ४४ हजार, माळी आणि कंत्राटी कर्मचारी २२ लाख २७ हजार, वीज देयके पाच लाख, फर्निचर साहित्य खरेदी पाच लाख रुपये झाल्याची माहिती आहे.
आयकर विभागाने मागविलेली माहिती गोळा केली जात आहे. वित्त व लेखा विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, यात जे काही वास्तव असेल, ते आयकर विभाग शोधून काढेल.
- मुरलीधर चांदेकर
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.