जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे २३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:17 AM2019-04-20T01:17:37+5:302019-04-20T01:18:24+5:30
स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने जिल्ह्यातून १ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान तपासणीला पाठविण्यात आलेले २३ रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आले होते. महापालिका हद्दीतील १४ व ग्रामीण भागातील नऊ रुग्णांचा यात समावेश आहे.
इंदल चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने जिल्ह्यातून १ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान तपासणीला पाठविण्यात आलेले २३ रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आले होते. महापालिका हद्दीतील १४ व ग्रामीण भागातील नऊ रुग्णांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात स्वाइन फ्लूने मागील वर्षी कहर केला. महापालिका हद्दीत अशा रुग्णांचे प्रमाण अधिक होते. त्या तुलनेत ग्रामीण भागात कमी असले तरी स्थिती चिंताजनक होती. त्यामुळे स्वाइन फ्लू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी अवघ्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती. ज्या भागात असे रुग्ण आढळून आलेत, त्या परिसराचे सर्वेक्षण, संशयितांच्या स्वॅबची तपासणीसाठी रवानगी, स्वच्छतेची शहानिशा आदी कामात आरोग्य कर्मचारी व्यस्त झाले होते. अनेकांचा आजार बरादेखील झाला. परंतु, तो पूर्णत: नष्ट झाला की नाही, हे पाहण्याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेने १ जानेवारीपासून शहरी व ग्रामीण भागात सर्वेक्षण केले. ५१ संशयितांचे स्वॅब तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी २३ रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला.
स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यापासून ३६ तासांच्या आत टॅमी फ्लूचा उपचार घेतल्यास हा आजार निश्चित बरा होतो. याची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा सामान्य रुग्णालयात केली जाते. आरोग्य विभागाने रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आजाराला प्रतिबंधक औषधीदेखील उपलब्ध केल्या आहेत.
स्वाइन फ्लू हा विषाणुमुळे होणारा आजार आहे. याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याला हवेमार्फत होतो. त्यामुळे खोकलताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा, हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत, भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी.
- सुरेश असोले,
जिल्हा आरोग्य अधिकारी