वरूड तालुक्यात २८ गावांत टंचाई, शहरांत सहा दिवसांआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:17 AM2019-05-18T01:17:47+5:302019-05-18T01:18:37+5:30
तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. पळसोना गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ३० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
यावर्षी पर्जन्यमान अल्प झाल्याने नदी-नाले, प्रकल्प कोरडेच राहिले. अवैध बोअरने अमर्याद उपसा केल्याने भूजल पातळी खालावली. त्याअनुषंगाने नुकताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुक्याचा दौरा करून जलसंधारण व पाणीटंचाईचा आढावा घेतला. करवार, सातनूर, बेनोडा, माणिकपूर व गव्हाणकुंडला भेट दिली. पळसोना येथे चार टँॅकर सुरू करण्याचे आदेश नवाल यांनी दिल्याचे नायब तहसीलदार सुदर्शन सहारे म्हणाले. विश्रामगृहावर महसूल, बांधकाम, कृषी, पं.स. अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागांप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पुरेशी साठवणक्षमता नसल्याने नागरिकांची परवड होत आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे. जमालपूर येथून २६ किमी हून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराला दरदिवशी ४० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणीटंचाईमुळे ते नियोजन कोलमडले आहे. शहरात दोन जलकुंभ असून त्यांची संचयक्षमता १३ लाख लिटरची आहे. त्यामुळे पळसोना गावाला टँकरने पुरवठा होत आहे.
शहरातही हाहकार
शहरात ९ हजार ५०० नळपुरवठाधारक आहेत. ९२ स्टँडपोस्ट आहेत. त्या स्टॅन्डपोस्टवर महिलांमध्ये होणारी शाब्दिक चकमक नित्याचीच झाली आहे. भूजलपातळी खालावल्याने शहरातील ९० टक्के विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना नळावरच अवलंबून राहावे लागते. जमालपूर पंपहाउसवरून होणारा पुरवठा लोणी, पिंपळखुटामार्गे येत असल्याने काही शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह लिकेज करून पाणी चोरल्याने शहराला होणºया पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली होती. त्याचा फटका दोन दिवसांवर येणारे नळ हे पाच ते सहाव्या दिवशी येऊ लागले. शहराबाहेरील वसाहतींमध्ये अद्यापही नळयोजना पोहोचली नसल्याने आणि या परिसरातील विहिरी आटल्याने तेथे नगरपरिषदेने तीन टँकर सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.