राज्यात २६ जागांवर आरटीओचे अधिकारी नाहीत!
By गणेश वासनिक | Published: May 11, 2024 11:08 PM2024-05-11T23:08:23+5:302024-05-11T23:09:03+5:30
नागपूर व अमरावती या दोन्ही विभागाची एकाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे जबाबदारी, रिक्त पदांकडे शासनाचे दुर्लक्ष.
अमरावती : राज्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २६ जागांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच चार ठिकाणी आरटीओ अधिकारीच नाही, येथे रामभरोसे कारभार सुरू असल्याचे विदारक चित्र प्रादेशिक परिवहन विभागात निर्माण झाले आहे.
राज्य शासनाला महसूल देणारा विभाग म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाची ख्याती आहे; मात्र ‘की पोस्ट’वर अधिकारी नियुक्त नसल्याने अतिरिक्त कार्यभारावर आरटीओ कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. अमरावती व नागपूर या दोन्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची जबाबदारी रामभाऊ गीते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यातील आरटीओशी संबंधित कामकाज हाताळताना गीते यांना मोठी कसरत करावी लागते. राज्य शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये मोटार वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत; परंतु ३० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आल्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत आरटीओच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.
पदोन्नती रखडली, कामे वाढली
प्रादेशिक परिवहन विभागात आरटीओ, डेप्युटी आरटीओ, एआरटीओ या श्रेणीत पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे पदोन्नतीशिवाय
वरिष्ठ पदांची जबाबदारी हाताळावी लागत आहे. यात बहुतांश मोटार वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षकांना सुद्धा पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. मनुष्यबळाची वानवा ही मोठी समस्या आहे.
आरटीओत नवीन आकृतीबंध लागू
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात नवीन आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. यात जुने ४०० पदे खारीज करून नव्याने
काही पदांना अपग्रेड करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविताना ७० टक्के कर्मचाऱ्यांंची पदे अपग्रेड झाली
आहेत; मात्र आजही आरटीओ, डेप्युटी आरटीओ, एआरटीओ या पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नतीची आस आहे.
या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे आहे अतिरिक्त कार्यभार
जितेंद्र पाटील (मुंबई), दिनकर मनवर( मुंबई), संदेश चव्हाण (मुंबई), प्रकाश जाधव (मुंबई), अशोक पवार (मुंबई पश्चिम), विनय अहिरे (मुंबई पूर्व), अभय देशपांडे (पनवेल), दीपक पाटील (कोल्हापूर), प्रदीप शिंदे (नाशिक), स्टीव्हन अल्वारीस
(धुळे), संजय मेत्रेवार (संभाजीनगर), रामभाऊ गीते (नागपूर), गजानन नेरपगार (लातूर), विनोद साळवी (कल्याण),
नंदकिशोर काळे (सिंधुदुर्ग), अर्चना गायकवाड (सोलापूर), राजेंद्र केसकर (बारामती), उर्मिला पवार (श्रीरामपूर), विनाेद सगरे
(सांगली), ज्ञानेश्वर हिरडे (यवतमाळ), हर्षल डाके (नागपूर शहर), मोहम्मद समीर (वर्धा), स्वप्निल माने (बीड), अनंता जोशी (हिंगोली), प्रकाश जाधव (मुंबई) या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. तसेच मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई मध्य, ठाणे आणि पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपद निरंक असल्याची माहिती आहे.