६२३ शाळांत महिला शिक्षिकाच नाहीत : कसे होणार समुपदेशन ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 11:51 AM2024-08-31T11:51:12+5:302024-08-31T11:51:59+5:30
शाळांची स्थिती : शिक्षिकांच्या नियुक्तीची आवश्यकता
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शाळांतील मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये राज्यात वाढ होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी अल्पवयीन मुला-मुलींचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ६२३ शाळांत महिला शिक्षिकाच नाहीत. त्यामुळे मुलींचे समुपदेशन होणार कसे, हा प्रश्न आहे. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. शाळांत विविध समित्या स्थापनेसह तक्रारपेट्या लावण्याचे सूचना दिल्या आहेत, परंतु शिक्षिकाच नसतील, तर मुलींचे समुपदेशन होणार कसे, असा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या शाळांत मुली आहेत. तेथे महिला शिक्षकांची नियुक्ती होणे गरजेचे आहे.
६२३ शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नाहीत
जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह इतर माध्यमांच्या सुमारे २ हजार ८६१ शाळा आहेत. यामध्ये ६२३ शाळांमध्ये महिला शिक्षक कार्यरत नसल्याची बाब समोर आली आहे.
कसे होणार मुलींचे समुपदेशन ?
- अत्याचाराच्या घटनांना लगाम लावण्यासाठी मुला- मुलींचे समुपदेशन होणे गरजेचे आहे.
- गुड टच आणि बॅड टचची माहिती मुला-मुलींना देणेही तितकेच गरजेचे आहे. परंतु, अनेक शाळांत महिला शिक्षिकाच नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
- शिक्षिका नसलेल्या शाळांत मुली असतील, तर त्यांचे समुपदेशन होईल कसे
आकडेवारी काय सांगते?
तालुका जि. प. शाळा महिला शिक्षिका नसलेल्या शाळा
अचलपूर १५६ ३७
अमरावती १०८ २६
अंजनगाव ९८ १७
भातकुली १०९ ३३
चांदुर बा १२७ ३८
चांदुर रेल्वे ७४ २२
चिखलदरा १६६ ९७
धामणगाव १४२ ७२
धारणी ९० ३८
मोर्शी १६९ ७४
नांदगाव खंडे ११२ ३७
तिवसा ७६ ३३
वरुड ११७ ३३
"शाळांमध्ये विविध समित्यांची स्थापनेसाठी सूचना दिल्या आहेत. जेथे महिला शिक्षिका नाहीत अशा शाळेत पर्यायी व्यवस्था करून महिला शिक्षिकांच्या माध्यमातून समुपदेशन करण्याबाबत बीईओंना सूचना दिल्या आहेत."
- बुद्धभूषण सोनोने शिक्षणाधिकारी