घरी बोअरवेल आहे काय? ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:38 AM2019-06-19T01:38:23+5:302019-06-19T01:39:02+5:30

शहरात बोअरवेलची संख्या अनिर्बंध वाढून अमर्याद उपसा सुरू असल्याने भूजलस्तर कमालीचे घटले आहे. यासाठी ज्या घरी बोअर आहेत, त्यांना आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे.

Is there a home bore? 'Rainwater Harvesting' is mandatory | घरी बोअरवेल आहे काय? ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

घरी बोअरवेल आहे काय? ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

Next
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचे निर्देश : मजीप्रा नळ देयकांसोबत देणार नागरिकांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात बोअरवेलची संख्या अनिर्बंध वाढून अमर्याद उपसा सुरू असल्याने भूजलस्तर कमालीचे घटले आहे. यासाठी ज्या घरी बोअर आहेत, त्यांना आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे. नळाच्या पुढील देयकासोबत याविषयीची नोटीस आता ज्या घरी बोअर आहेत, त्यांना बजावली जाणार आहे.
शहरात पाणीटंचाई नाही, याचा अर्थ असाही नाही की, पाण्याचा अनिर्बंध वापर करावा. मजीप्राद्वारे शहराला पाणीपुरवठा होत आहे. या प्रक्रियेत पिण्याच्या पाण्याचा वापर नागरिक रस्त्यावर टाकण्यासाठी, गाड्या धुणे व इतर कामांसाठीही करीत आहेत. शहरातील बहुतांश नागरिकांच्या घरी नळाव्यतिरिक्त बोअरवेलदेखील आहेत. त्याद्वारे भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत भूजल पुनर्भरण होत नसल्याने दिवसेंदिवस शहराची भूजल पातळी खोल जात आहे. यावर उपाययोजना म्हणून भूजलस्तरात वाढ होण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्डा या मुद्द्यावर महापालिका आयुक्त संजय निपाणे आग्रही आहेत. त्यांनी याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दोन वेळा पत्र बजावले. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा या नात्याने शहरात ज्या नागरिकांच्या घरी बोअरवेल आहे, त्यांना शास्त्रीय पद्धतीने शोषखड्डा व रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बंधनकारक करावी. त्यासाठी नळाचे देयकासोबत संबंधित नागरिकांना याविषयीची नोटीस बजावण्यात यावी व मजीप्रा स्तरावरूनही कारवाई व्हावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

भूजल पुनर्भरणसाठी १२२४ ठिकाणी उपाययोजना
शहरात एका महिन्याच्या अवधीत १२२४ ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आयुक्त संजय निपाणे यांनी सर्वप्रथम स्वत:च्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले होते. यानंतर एक महिन्याच्या अवधीत ५२ अधिकारी व २६४ कर्मचाऱ्यांनी घरी तसेच महापालिकेच्या आठ कार्यालयांत ही यंत्रणा उभारली. ९० उद्याने, ४० बगीचे, महापालिकेच्या रस्त्याचे बाजूला कंत्रादारामार्फत १३ ठिकाणी शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्रेडाईमार्फत महापालिका हद्दीतील १९२ सदनिकांत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या ३० शाळा, ३० दवाखाने तसेच २१७ नागरिक व इतर सहभागातून ५१० तसेच ५६ आरओ प्लांटमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली. हा जलजागृतीचा परिणाम आहे.
रस्ता बांधकामाच्या २०० मीटर अंतरात शोषखड्डा
शहराची भूजलपातळी घटल्याने सिमेंट रस्त्यावरून वाहत जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी आता रस्त्याच्या २०० ते ३०० मीटर अंतरात शोषखड्डा तयार केला जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत पत्र देण्यात आले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत भूजलस्तर दिवसेंदिवस खालावत जात आहे. त्यामुळे सामूहिक व्यवस्थापन व नियोजन अगत्याची असल्याची बाब उपायुक्तांनी स्पष्ट केली.

Web Title: Is there a home bore? 'Rainwater Harvesting' is mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस