शेतात जाण्याकरिता रस्ता मिळेना; शेतकऱ्याचा आत्मघात

By प्रदीप भाकरे | Published: August 21, 2023 04:34 PM2023-08-21T16:34:57+5:302023-08-21T16:36:06+5:30

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा : काटपूर येथील घटना

There is no road to go to the farm, Farmer committed suicide | शेतात जाण्याकरिता रस्ता मिळेना; शेतकऱ्याचा आत्मघात

शेतात जाण्याकरिता रस्ता मिळेना; शेतकऱ्याचा आत्मघात

googlenewsNext

अमरावती : शेतात ये जा करण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने विषाचा घोट घेतला. २८ एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास मोर्शी तालुक्यातील काटपूर येथे ती घटना घडली होती. रवींद्र धनराज बुरे (४७, रा. काटपुर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी प्रवीणदास रामदास बेलखेडे (५२, रा. वाघोली, ता. मोर्शी) याच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. आपल्या पतीने आरोपीच्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मृताच्या पत्नीने नोंदविली.

तक्रारीनुसार, रविंद्र बुरे यांच्या शेतात जाण्याकरिता आरोपीच्या शेतातून रस्ता होता. परंतु गेल्या दोन वर्षापासून आरोपी प्रवीणदास याने तो शेताचा रस्ता बंद केला. तू कोणत्याही कोर्टात जा, तुला माझ्या शेतातून तुझ्या शेतात जाण्याकरिता रस्ता देत नाही, असे म्हणून प्रवीणदासने रविंद्र बुरे यांना शिवीगाळ केली. तथा मानसिक त्रास दिला. त्यामुळे बुरे यांना शेतीची मशागत करता येत नव्हती. त्यामुळे ते विमनस्क झाले. अशातच त्यांनी २८ एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास काटपूर येथील राहत्या घरी किटकनाशक प्राशन केले.

कुटुंबियांनी त्यांना तातडीने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान बुरे यांचा मृत्यू झाला. त्यावेळी शिरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. तथा तपास सुरू केला. तपासादरम्यान मृताच्या पत्नीसह अन्य काही जणांचे बयान नोंदविण्यात आले. त्यातून आरोपी प्रवीणदासच्या छळामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. तसे बयान मृताची पत्नी स्वाती बुरे यांनी दिले. त्यावरून रविवारी आरोपीविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: There is no road to go to the farm, Farmer committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.