पहिल्या दिवशी तालुक्यात एकही अर्ज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:25+5:302020-12-24T04:13:25+5:30
ग्रामपंचायत निवडणूक, आनलाईन प्रक्रियेमुळे अडचणी चांदूरबाजार : तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतील नामांकन अर्ज ...
ग्रामपंचायत निवडणूक, आनलाईन प्रक्रियेमुळे अडचणी
चांदूरबाजार : तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतील नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली. यात पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. कारण नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने, पहिल्या दिवशी कोणाचाच उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सर्वच इच्छुक उमेदवार पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी आपले नामांकन अर्ज ऑनलाईन भरतात. त्यानंतर नामांकन अर्ज, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करतात. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. त्यामुळे सावकाश अर्ज दाखल करू, असा अनेक इच्छुक उमेदवारांचा विचार दिसत आहे.
यापूर्वी रद्द झालेल्या निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण, निवडणूकपूर्व जाहीर झाले होते. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुकांनी, आपल्याला सरपंचपदासाठी पोषक असे पॅनल वाॅर्डनिहाय सेट केले होते. परंतु नव्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत, सरपंचपदासाठीचे आरक्षण हे निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. अनेक सरपंचपदाच्या इच्छुकांची यात गोची झाली. त्यामुळे आता बहुतांश ग्रामपंचायतींत नव्याने पॅनेल सेट करावे लागणार आहे. यामुळेही नामांकन दाखल करण्यास वेळ होऊ लागू शकतो.
सरपंचपदाचे पुढचे आरक्षण काय निघेल याचा कयास बांधून किंवा कोणत्याही पदासाठी सरपंच आरक्षण निघाले तर,आपण नाही तर आपल्या गटाचाच सरपंच असावा. यासाठी खुल्यासह सर्वच आरक्षित वर्गवारीनुसार, उमेदवार उभे करावे लागणार आहेत. त्यामुळे नव्याने पॅनेल सेट करतांना, आयत्यावेळी सरपंचपदासाठी धोका व्हायला नको. याचा विचार करूनच, ग्रापंचायतीसाठी पॅनेल कडून उमेदवार उभे केले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत गावातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांची पॅनेल सेट करताना चांगलीच दमछाक होत आहे. हे ही विलंबाने नामांकन दाखल होण्याचे एक कारण होऊ शकते.
तसेच उमेदवारी दाखल करताना बहुतांश कागदपत्रे व बँक पासबुक नव्याने तयार करावे लागणार आहे. त्यामुळे ही उमेदवारी नव्याने दाखल करण्यास विलंब होत असावा. त्यामुळे २८ डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्याऱ्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.