नेत्यांसाठी लाखोंचे रस्ते, रुग्णांसाठी सिटी स्कॅन नाही
By admin | Published: January 20, 2016 12:32 AM2016-01-20T00:32:49+5:302016-01-20T00:32:49+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनानिमित्त रात्रीतून ५० लाख रुपयांचा रस्ता निर्माण केला जातो.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा : परिचारिका पदभरतीची बोंबाबोंब, रुग्णसेवा ढासळली
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनानिमित्त रात्रीतून ५० लाख रुपयांचा रस्ता निर्माण केला जातो. मात्र,मागिल पाच वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्वीन) येथे सिटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे मशीन शासनाने उपलब्ध करुन दिलेले नाही. त्यामुळे शासन गरीब, सामान्यांबद्दल किती सजग आहे, हे दिसून येते.
येथील इर्विन रुग्णालयास राज्य शासनाने ‘ट्रामा केअर’ चा दर्जा देऊन अत्यावश्यक रुग्णसेवेची जबाबदारी दिली आहे. मात्र, इर्विनची रुग्णसेवा कोमात गेली असताना याकङे लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिनचे आयुष्य संपल्याने ती कधीचीच बंद पडली आहे तर एक्स-रे मशिनचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे अपघात अथवा एखाद्या गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय यंत्रणेची पाच वर्षांपासून कसरत होत आहे. इर्विनच्या शल्य चिकित्सकांनी सिटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे मशिनची गरज अनेकदा वरिष्ठांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविली आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाचे कामकाज ‘आंधळं दळते, कुत्रं पिठ खाते’ असा सुरु आहे. इर्र्विनची रुग्णसेवा ढासळत चालली असताना या गंभीर समस्येविषयी एकाही आमदारांनी विधिमंडळात आवाज उचलू नये, ही बाब लाजिरवाणी मानली जात आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नववर्षाच्या प्रारंभीच असलेल्या दौऱ्यासाठी प्रशासनाने सातुर्णा परिसरातील ५० लाख रुपयातून रस्त्याचे डांबरीकरण रात्रीतून करण्याची किमया केली.
इतकेच नव्हे तर सर्वच लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आपसात स्पर्धा करताना दिसून आले. जिल्ह्यातील रुग्णसेवेचा भार इर्विन रुग्णालयावर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ट्रामा केअर सेंटर म्हटले की रुग्णाला तत्काळ अत्यावश्यक सेवा मिळायला हवी. परंतु इर्विन रुग्णालयात सिटी स्कॅन डिजिटल एक्स-रे मशिन नसल्यामुळे एका अपघाताच्या घटनेनंतर उपचारास दाखल झालेल्या रुग्णांवर वेळीच योग्य ते उपचार करता आलेनाही. एकूण मागिल पाच वर्षांत शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागल्याचे वास्तव आहे.
काही दिवसांपूर्वी इर्विन रुग्णालयाची रंगरंगोटी करुन या ब्रिटिशकालिन वास्तूला नवा लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रुग्णसेवेसाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी वर्ग, परिचारिकांची वानवा असल्यामुळे रुग्णसेवेचा डोलारा कसा सांभाळावा, या चिंतेत जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. रुग्णसेवेला प्राधान्य देणे क्रमप्राप्त असताना इर्विन रुग्णालयातील मुलभूत समस्या सोडविण्याऐवजी प्रशासन मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री अन्य मंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व देत असल्याचे दिसून येते. स्थानिक सातुर्णा परिसरात मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्यामुळे १ जानेवारीला रात्रीतून रस्ता निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला मात्र सिटी स्कॅन मशिनसाठी केवळ दोन कोटी रुपये मंजूर करण्यासाठी आमदार, खासदारांना पाठपुरावा करण्याचे कर्तव्य बजावता येत नाही, हे वास्तव आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे अद्ययावत सोयी, सुविधा, यंत्रसामुग्री पुरविण्याची गरज आहे.