व्याघ्र प्रकल्पात ‘कोरोना इफेक्ट’ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:00 AM2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:01+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह, शहानूर, वैराट, चिखलदरा, हरिसाल, धारगडसह सर्व पर्यटनक्षेत्रात पर्यटकांची नियमित हजेरी लागत आहे. या पर्यटकांना वन्यजीव दर्शनही घडत आहे. सुटीच्या दिवशी वा आठवड्याच्या अखेरीस सरासरी जेवढे पर्यटक यायचे, तेवढेच पर्यटक आजही येत आहेत. पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पर्यटनावर अद्याप ‘कोरोना इम्पॅक्ट’ जाणवला नसल्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह, शहानूर, वैराट, चिखलदरा, हरिसाल, धारगडसह सर्व पर्यटनक्षेत्रात पर्यटकांची नियमित हजेरी लागत आहे. या पर्यटकांना वन्यजीव दर्शनही घडत आहे. सुटीच्या दिवशी वा आठवड्याच्या अखेरीस सरासरी जेवढे पर्यटक यायचे, तेवढेच पर्यटक आजही येत आहेत. पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही.
अमरावती विभागातील बुलडाणा, शेगाव, खामगाव, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावतीसह नागपूर विभागातील पर्यटकांचा त्यात समावेश आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत केली गेलेले आगाऊ बूकिंग कुणीही रद्द केलेले नाही. केवळ मुंबई-पुणे येथील एका समूहाने कॉन्फरन्सकरिता सेमाडोह निसर्ग निर्वचन संकुलातील आपले १० एप्रिलचे बूकिंग स्वत:हून रद्द केले. कोरोनाच्या धर्तीवर रद्द होणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे पहिले बूकिंग ठरले आहे.
दहा वर्षांत १०२ विदेशी पर्यटक
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनाकरिता येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या नगण्य आहे. दहा वर्षांत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला केवळ १०२ विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या. यात २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ४४ विदेशी पर्यटक तर १ एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१९ पर्यंत सहा महिन्यांत २० विदेशी पर्यटक येथे येऊन गेले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर एकाही विदेशी पर्यटकाचे व्याघ्र्र प्रकल्पाकडे बूकिंग नाही.