संप नव्हे आत्मसन्मानाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:25 PM2018-09-29T22:25:03+5:302018-09-29T22:25:25+5:30
कुणीही यावे अन् कुणालाही मारून जावे, अशी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थिती झालेली आहे. यामुळे आमची सुरक्षिताता धोक्यात आली असून सनदशीर मार्ग असताना अनेक उपटसुंभाची मजल अधिकाऱ्यांच्या कॉलरपर्यंत जाते, ही अत्यंत खेदजनक बाब असून पुकारलेला संप नव्हे, तर ही आमची आत्मसन्मानाची लढाई असल्याची भूमिका घेत महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी कामकाज बंद ठेवले. हे कामबंद आंदोलन २ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कुणीही यावे अन् कुणालाही मारून जावे, अशी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थिती झालेली आहे. यामुळे आमची सुरक्षिताता धोक्यात आली असून सनदशीर मार्ग असताना अनेक उपटसुंभाची मजल अधिकाऱ्यांच्या कॉलरपर्यंत जाते, ही अत्यंत खेदजनक बाब असून पुकारलेला संप नव्हे, तर ही आमची आत्मसन्मानाची लढाई असल्याची भूमिका घेत महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी कामकाज बंद ठेवले. हे कामबंद आंदोलन २ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीदिनी हारार्पण करूनच आपण कामाला हात लावू, असा ठाम पवित्रा या अधिकारी, कर्मचाºयांनी घेतला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय गव्हाळे यांनी सहायक आयुक्त प्रशांत शेळके यांची कॉलर पकडून आयुक्त संगय निपाणे यांच्या दालनात अर्वाच्य शिवीगाळ केली. व अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना धक्काबुक्की व मारहाण केली. महापालिका कार्यालय व नरसिंग सरस्वती नगरात शुक्रवारी हा प्रकार घडला होता. या घटनेचा निषेध म्हणून महापालिकेतील १६०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाºयांनी संप पुकारला. दरम्यान आयुक्त संजय निपाणे यांनी अधिनिस्थ यंत्रणेशी चर्चा करून बंद मागे घेण्याची सूचना केली होती. मात्र, संप नव्हे, ही तर आत्मसन्मानाची लढाई असल्याचे सांगत संपात सहभागी झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची सूचना नाकारली. शनिवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी राजकमल चौकस्थित मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात एकत्र आले. यात उपायुक्तांसह मुख्यलेखा परीक्षक, वैदयकीय आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता, अधीक्षक, शिक्षणाधिकारी, एडीटीपी, अधीक्षक, कनिष्ठ तथा वरिष्ठ लिपिक, शिपाई, स्वच्छता कामगार आदी संपात सहभागी झाले.
महापौरांना निवेदन
वारंवार होणारे भ्याड हल्ले, अश्लील शिवीगाळ यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले असून, मानसिक संतुलन बिघडले आहे. महापालिकेत काम करण्याची मनस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदन शनिवारी महापौर संजय नरवणे यांना देण्यात आले. निवेदनाची प्रत पालकमंत्री, नगरविकास राज्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त व अन्य संबंधित यंत्रणेला पाठविण्यात येणार आहे.