अमरावती-परतवाडा मार्गावर सहा वर्षापासून जॉबवर्क नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:13+5:302021-09-11T04:14:13+5:30
परतवाडा : वरिष्ठांच्या आदेशान्वये अमरावती-परतवाडा राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या अधिकाऱ्यांना सन २०१५ पासून जॉबवर्क घेताच आले नाही. ...
परतवाडा : वरिष्ठांच्या आदेशान्वये अमरावती-परतवाडा राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या अधिकाऱ्यांना सन २०१५ पासून जॉबवर्क घेताच आले नाही. त्यामुळे या राज्य महामार्गाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. खड्ड्यांचे या रस्त्यावर साम्राज्य पसरले आहे.
सन २०१५ मध्ये राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न नागरिकांनसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे ठेवले गेले. या स्वप्नपूर्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मार्गाचे सर्वेक्षण केले गेले. डीपीआर मंजूर केला गेला. एवढेच नव्हे तर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे स्वप्न भावले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लागलीच या रस्त्यावर कुठलेही काम, कुठलाही जॉबवर्क घेण्यात येऊ नये, असे निर्देश अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावर अचलपूरच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे वरिष्ठांचे निर्देश पाळलेत. बघता बघता रस्त्यांची दुर्दशा शब्दांपलीकडे पोहोचली. दरम्यान मांजर आडवी गेली आणि राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न धुळीस मिळाले.
दरम्यान २०१५ पासून या रस्त्याचे भिजतघोंगडे असतानाच सन २०१८ मध्ये या रस्त्याच्या अनुषंगाने एशियन डेव्हलपमेंट बँकेचे दुसरे स्वप्न दाखवल्या गेले. या स्वप्नपूर्तीकरिता एशियन डेव्हलपमेंट बँकेने या रस्त्याचे सर्वेक्षण करून घेतले. डीपीआरही बनविला. हे स्वप्न पूर्णत्वास जाण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच परत एकदा मांजर आडवी गेल्याने रस्त्याची दुर्दशा त्यापेक्षाही अधिक झाली.
अमरावती-परतवाडा असा ५४ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून एकापेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रातून तो जातो. या रस्त्याची स्थिती बघता अमरावती वरून वलगाव, वायगाव, आष्टी, पूर्णा नगर पर्यंत या रस्त्यावर संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जॉब वर्क घेतल्यामुळे, त्या दरम्यानची रस्त्याची स्थिती व्यवस्थित आहे. खड्ड्यांचे प्रमाण नगण्य आहे.पुढे हाच रस्ता अचलपूर विधानसभा क्षेत्रातून जातो. तेव्हा या दरम्यानची या मार्गाची स्थिती अत्यंत बिकट बनविला आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
बॉक्स
वाहतूक वाढली
अमरावती परतवाडा बऱ्हाणपूर इंदोर या आंतरराज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. यात जड वाहनांची वाहतूक लक्षवेधक ठरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदीनुसार हजारो वाहनांची या रस्त्याने ये जा असून हजारो मॅट्रिक टन वजनाची ही वाहतूक आहे.