वरूड तालुक्यात कोरोना मृतांची यादीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:52+5:302021-09-16T04:16:52+5:30
पान २ लीड खळबळजनक वास्तव, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो, तहसील कार्यालय बेभान प्रशांत काळबेंडे - जरूड : तालुक्यात करोनाने किती ...
पान २ लीड
खळबळजनक वास्तव, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो, तहसील कार्यालय बेभान
प्रशांत काळबेंडे - जरूड : तालुक्यात करोनाने किती जणांचा मृत्यू झाला, याची कोणतीही नोंद तहसील कार्यालय, आरोग्य विभागाकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्याचे कसलेही सोयरसुतक नसल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.
तालुक्यात १४४ गावे असून प्रत्येक गावात कोरोनाने मृत्यू झाला आहे. कुणी अमरावती, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात, तर कुणी खाजगी रुग्णालयात दगावले. या सर्व बाबींची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी सर्व तहसील कार्यालयांना कोरोनाने मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींची यादी अद्ययावत ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, वरूड तहसीलला अद्याप कोणतीही अधिकृत यादीच तयार नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो देण्याचे काम निर्ढावलेले महसूल प्रशासन करीत असून प्रत्येक यंत्रणा याबाबत एक-दुसऱ्याकडे अंगुलीनिर्देश करीत आहे. आजपर्यंत मृतांची कोणतीही यादी आमच्याकडे उपलब्ध नाही. यादी आरोग्य विभागाकडे असेल, असे उत्तर प्रभारी तहसीलदार घोडेस्वार यांनी दिले.
तहसील कार्यालय झाले बेभान
तहसील कार्यालयाला पाच महिन्यांपासून तहसीलदार हे पद रिक्त आहे. प्रभारी तहसीलदार घोडेस्वार यांचा कोणताही अंकुश अधिनस्थ कर्मचारी व सहकाऱ्यांवर नसल्याने ते केव्हाही येतात, केव्हाही जातात. कार्यालयीन वेळेत नायब तहसीलदारसारखी व्यक्ती बारमध्ये रंगेहाथ पकडली जाते. शासकीय कामे करण्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला असून, पैसे मोजल्याशिवय सामान्य नागरिकांचे काम होताच नाही. नक्कल विभागात प्रत्येक भरमसाठ पैसे दिल्याशिवाय कोणतेही नक्कल मिळताच नाही. बेभान झालेल्या तहसील कार्यालयावर आमदार देवेंद्र भुयार यांनी अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे सामान्य जनतेतून बोलले जात आहे.