स्मशानभूमीत सरण रचायलाही कोणी नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:00+5:302021-05-25T04:13:00+5:30
अचलपूरची दशा : कोरोना संक्रमण वाढतेच अनिल कडू पान २ची लीड फोटो पी २४ परतवाडा लोकमत न्यूज नेटवर्क ...
अचलपूरची दशा : कोरोना संक्रमण वाढतेच
अनिल कडू
पान २ची लीड
फोटो पी २४ परतवाडा
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कोरोना संक्रमित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर परतवाडा येथील स्मशानभूमीत सरण रचायलाही कुणी नाही. खासगी कोविड रुग्णालयापासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेल्या हिंदू स्मशानभूमीत मृतदेह पोहोचविण्याकरिता काही ॲम्बुलन्सवाले दीड हजार रुपये तर काही अडीच हजार रुपये रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेतात. सरकारी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलपासून अवघ्या अर्धा किलोमीटरवरील या स्मशानभूमीत मृतदेह पोहोचविण्याकरिता रुग्णवाहिकाधारक एक हजारहून अधिक रुपये घेतात.
अमरावती महानगरपालिकेच्या धर्तीवर कोरोना संक्रमित रुग्णाचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत विनामूल्य पोहोचविण्याची जबाबदारी अचलपूर नगरपालिकेची ठरते. पण नगरपालिकेकडून या अनुषंगाने कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. कोरोना संक्रमिताचा मृतदेह हिंदू स्मशानभूमीत पोहोचवल्यानंतर तेथे नातेवाईकांनाच पीपीई किट्स न घालता लाकडे गोळा करून सरण रचावे लागते. दरम्यान, रुग्णवाहिकेमधील व्यक्तीने हातभार लावला तर त्याचे अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. स्मशानभूमीत उपलब्ध लाकडे ओली असल्यामुळे त्याठिकाणी रॉकेल आणि माचीसची गरज भासते, तेव्हा मृतदेहासोबतच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडते. यात स्मशानभूमीत असताना पुरेसे पैसे जवळ नसणाऱ्यांची चांगलीच दमछाक होते. कोरोना संक्रमितांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना होणारा त्रास शब्दांपलीकडचा ठरत आहे.
कोरोना नियमावली व कोरोना संक्रमिताच्या मृत्यूनंतर पाळावयाचा प्रोटोकॉल पायदळी तुडवल्या जात आहे. काही मंडळी केवळ फोटो काढण्यापुरती पीपीई किट्स मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर घालतात आणि नंतर त्या किट्स काढून त्याच जळत्या सरणावर टाकतात. एवढेच नव्हे तर त्या मृतकासोबत रुग्णालयातून पाठविल्या गेलेल्या टाकाऊ वस्तूही त्याच चितेवर टाकल्या जातात. पीपीई किट्सची विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था या स्मशानभूमीत नाही. एकट्या-दुकट्या नातेवाईकाला लाकडं (सरण) रचण्यास मदत करणारी यंत्रणा त्याठिकाणी नाही.