मतदान कार्डावर अनेक मतदारांचे छायाचित्रच नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 03:49 PM2018-06-28T15:49:22+5:302018-06-28T15:49:39+5:30
भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम २०१८ च्या अनुषंगाने वाशिम विधानसभा मतदार संघांतर्गत वाशिम शहरातील एकूण ५६ मतदान केंद्राच्या मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे छायाचित्र नसल्याची माहिती समोर आली.
वाशिम - भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम २०१८ च्या अनुषंगाने वाशिम विधानसभा मतदार संघांतर्गत वाशिम शहरातील एकूण ५६ मतदान केंद्राच्या मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे छायाचित्र नसल्याची माहिती समोर आली. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र संकलित करुन ईआरओ-एनईटी प्रणालीद्वारे अपलोड केले जात आहेत.
मतदारांचे रंगीत छायाचित्र संकलीत करण्याची जबाबदारी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्यावर सोपविण्यात आली आहे तसेच मतदारांना वाशिम तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागात रंगीत छायाचित्र पुरविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांना सर्व मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्यांचे रंगीत छायाचित्र संकलित करुन तहसिल कार्यालयात जमा करण्याचे निर्देश तहसिलदार बळवंत अरखराव यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित यादी भागाचे बी.एल.ओ. यांनी जाहिरनाम्यात नमुद असलेले मतदार हे नमुद पत्त्यावर राहत नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्यांची पडताळणी करुन त्यांचे छायाचित्र संकलित करण्याकरीता त्यांच्या नावाची यादी तहसिल कार्यालय वाशिम, नगर परिषद वाशिम, पंचायत समिती वाशिम, मंडळ अधिकारी कार्यालय वाशिम येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्व संबंधित मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांनी सात दिवसांचे आत संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे किंवा तहसिल कार्यालय, वाशिम (निवडणूक शाखा) येथे रंगीत छायाचित्र जमा करावा. अन्यथा यादीत नमूद मतदार हा वाशिम शहरात राहत नसल्याचे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बळवंत अरखराव यांनी दिला.