रेल्वेत पार्सल तपासणारी स्वतंत्र यंत्रणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:22 PM2018-05-08T16:22:15+5:302018-05-08T16:22:15+5:30

रेल्वे गाड्यांच्या पार्सलमधून नेमके काय पाठविले जाते, हे तपासणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वेत घातपाती कारवायांसाठी समाजकंटक पार्सलद्वारे शस्त्रे व स्फोटक पदार्थ सहजतेने

There is no separate system for checking the parcel of the railway | रेल्वेत पार्सल तपासणारी स्वतंत्र यंत्रणा नाही

रेल्वेत पार्सल तपासणारी स्वतंत्र यंत्रणा नाही

Next

गणेश वासनिक 

अमरावती : रेल्वे गाड्यांच्या पार्सलमधून नेमके काय पाठविले जाते, हे तपासणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वेत घातपाती कारवायांसाठी समाजकंटक पार्सलद्वारे शस्त्रे व स्फोटक पदार्थ सहजतेने पाठवू शकतात, असा पार्सल विभागाचा कारभार हल्ली सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यात रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना मेटल डिटेक्टर, बॅग, सुटकेस व अन्य सामानांच्या तपासणीसाठी लगेज स्कॅनर, मुख्य स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे, बंदुकधारी रेल्वे पोलिसांचा फौजफाटा, रेल्वे प्लॅटफार्मवर समाजाविघातक कृत्य करणाºयांवर पाळत ठेवण्यासाठी दुर्बिणधारी सुरक्षा रक्षक अशा विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र, लांब पल्ल्यांच्या प्रवासी गाड्यांसमवेत असलेल्या पार्सल डब्यातून पार्सलद्वारे काय पाठविले जाते, याबाबत बारकाईने तपासणी केली जात नाही. पार्सलच्या नावे  साहित्य, वस्तू आणि सामानांचे पॅकबंद खोके आदी पाठविले जाते. मात्र, पार्सलच्या नावे पॅकबंद डब्यातून नेमके काय पाठविण्यात आले, हे पार्सल निरीक्षकांना कधीच कळत नाही. पार्सल कार्यालयात पॅकिंग आलेले साहित्य कोठे पाठवायचे आणि कोणी पाठविले, हाच उल्लेख असतो. परंतु, पार्सलमध्ये नेमके काय आहे, हे आजतागायत तपासण्यात आले नाही. त्यामुळे रेल्वेत घातपाती कारवायांसाठी  समाजकंटकांना पार्सल सेवा अतिशय सोयीची ठरणारी असल्याचे चित्र आहे. केवळ पार्सलने जाणारे साहित्याचे वजन केले जाते. त्यानंतर ते कोणत्या रेल्वे स्थानकावर पाठवायचे आहे, त्यानुसार पार्सलचे दर वसूल निश्चित केले जाते. मात्र, मध्य रेल्वे मुंबई विभागांतर्गत एकाही रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात पार्सलमधून जाणारे साहित्य, वस्तू तपासणारी यंत्रणा नाही, हे वास्तव आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरील पार्सल सेवा २६ एप्रिलपासून बंद करून येथील कार्यालय गुंडाळले आहे. मात्र, अमरावती रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात स्वतंत्र तपास यंत्रणा नसल्याचे दिसून आले.
      
पार्सल कक्षाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
रेल्वे प्रशासनाला महसूल उत्पन्न मिळवून देणाºया पार्सल सेवेच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष चालविले आहे. पार्सलमधून सहजतेने कोणतेही साहित्य, वस्तू पाठविता येईल, असे ढिसाळ नियोजन रेल्वे प्रशासनाने या विभागाचे ठेवले आहे. कोणीही यावे अन् काहीही पाठवावे, असा अफलातून कारभार हल्ली पार्सल कक्षाचा सुरू आहे. त्यामुळे २६/११ च्या दशहतवादी हल्ल्यातून रेल्वे प्रशासनाने अद्यापही बोध घेतला नसल्याचे यावरून स्पष्ट होते.

बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून आकस्मिक तपासणी
अमरावती रेल्वे स्थानकावरील पार्सल कक्षाची शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून आकस्मिक तपासणी केली जाते. हे पथक श्वानासह अन्य यंत्राद्व्रारे सुरक्षिततेच्या दृष्टीने पार्सल क क्ष पिंजून काढतात. मात्र, रेल्वेकडून पार्सल कक्षाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

पार्सलमधून जाणारे साहित्य, वस्तू तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. आलेले साहित्य रेल्वेत पार्सलद्वारे पाठविले जाते. याबाबत कोणत्याही रेल्वे स्थानकावर सुविधा नाही.
  - शालिकराम नंदनवार,
  पर्यवेक्षक, मुख्य बुकींग पार्सल अमरावती

Web Title: There is no separate system for checking the parcel of the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.