पेट्रोलपंपांची तांत्रिक तपासणी नाही
By admin | Published: June 19, 2017 12:12 AM2017-06-19T00:12:29+5:302017-06-19T00:12:29+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोलपंपांवर इंधन चोरी होत असताना जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तांत्रिक तपासणी केव्हा करणार, ...
चालकांना सवाल : इलेक्ट्रिक चीप वापरून पेट्रोल चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोलपंपांवर इंधन चोरी होत असताना जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तांत्रिक तपासणी केव्हा करणार, असा सवाल वाहन चालकांकडून केला जात आहे. इलेक्ट्रिक पल्सर चीपद्वारे पेट्रोल पंपावर चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
सततच्या पेट्रोल, डिझेल दराच्या वाढीमुळे अगोदरच वाहन चालक हैराण झाला आहे. मात्र पेट्रोल पंप चालकांकडून आधुनिक तंत्रनाज्ञानाचा वापर करुन इंधन चोरीच्या नावे वाहन चालकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असेल तर या गंभीर बाबीला जबाबदार कोण? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या नियंत्रणात पेट्रोलपंप चालविले जातात. परंतु या पेट्रोलपंपांवर विक्री होणारे इंधन हे भेसळयुक्त तर नाही, हे तपासण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाची आहे. किंबहुना वाहनचालकांसाठी शौचालय, बाथरुम, पिण्याचे पाणी, वाहनात हवा भरण्याची सोय आदी महत्त्वाच्या बाबी असणे अनिवार्य आहे. मात्र, शहरातील ९९ टक्के पेट्रोलपंपांवर वाहन चालकांसाठी कोणत्याही सोईसुविधा नसल्याचे वास्तव आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर काही मोजक्याच पेट्रोलपंपांवर जुजबी सुविधा आहे. तरीही जिल्हा प्रशासन अशा पेट्रोलपंपांना सील का करीत नाही? हे महत्त्वाचे आहे. पेट्रोलपंपांवर तांत्रिक तपासणीची जबाबदारी अपर जिल्हाधिकाऱ्यांची आहे. वाहन चालकांकडून पूर्ण पेट्रोल दिल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात वाहनात कमी पेट्रोल मिळत असल्याची अनेक वाहनचालकांची ओरड आहे. वाहन कमी चालल्यानंतरही अधिक इंधन लागते, हा अनेक दिवसांपासूनचा शिरस्ता आहे. वाहनातून नेमके इंधन जाते कोठे, हा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील काही पेट्रोलपंप चालक इलेक्ट्रिक पल्सर चीपद्वारे पेट्रोलची चोरी करीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोलपंपाची तांत्रिक तपासणी केली जात नसल्याने पंप चालकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या चोरीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पाच लिटरमागे २०० मिलिमीटरची चोरी
पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक आणि पेट्रोल चोरीने कळस गाठला आहे. इलेक्ट्रिक चीपचा वापर करुन पंपावर पाच लिटरमागे २०० मिलिमीटर पेट्रोलची चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. पेट्रोल चोरीचे हे सत्र शहरासह ग्रामीण भागातही सुरू असून यावर जिल्हा प्रशासन, पोलिसांच्या गुन्हे शाखेने निर्बंध आणावा, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. शहरात सुमारे २५ तर ग्रामीण भागात ८४ पेट्रोल पंप आहेत.
यापूर्वी पेट्रोलपंपांची प्राथमिक तपासणी केली असता काही उणिवा किंवा दोष आढळले नाहीत. मायक्रो चीप वापरुन पेट्रोलची चोरी होत असल्याची तक्रारी मिळाली. मात्र तंज्ज्ञ चमूअभावी तशी तपासणी करता आली नाही.
- डी.के. वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती
माझ्याकडे नवीन दुचाकी वाहन आहे. मात्र कंपनीद्वारे दिल्याप्रमाणे वाहनाला मायलेज मिळत नाही. वाहनात पेट्रोल टाकून हैराण झालो आहे. कदाचित पेट्रोल पंपातूनच पेट्रोलची चोरी होत असावी, यात दुमत नाही.
- विकास डोंगरे,
राहुलनगर, बडनेरा