कडाक्याची थंडी, पांघरायला काहीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:14 AM2017-12-06T00:14:02+5:302017-12-06T00:14:56+5:30
येथील उपजिल्हा रूग्णालयातील चादरी गायब झाल्याचा व्हिडिओ सध्या संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला. यामुळे आरोग्य विभागाची लख्तरे समोर आली आहेत.
गोपाल डहाके ।
आॅनलाईन लोकमत
मोर्शी : येथील उपजिल्हा रूग्णालयातील चादरी गायब झाल्याचा व्हिडिओ सध्या संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला. यामुळे आरोग्य विभागाची लख्तरे समोर आली आहेत. कडाक्याची थंडी असताना रुग्णांना अंथरूण व पांघरूण मिळत नसल्याने रुग्णांची प्रकृती आणखीच खराब होण्याची शक्यता बळावली आहे.
मोर्शी उपजिल्हा रूग्णालयात शासकीय आकडेवारीनुसार एकूण ५० खाटा आहेत. मात्र, रुग्णालयात सध्या ७५ बेड लावले आहेत. यानुसार शासकीय रुग्णालयात ३०० चादरी असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या केवळ ६० चादरी असल्याची माहिती आहे. रुग्णालयातील चादरी पुरेशा नसल्यामुळे सामान्य वार्डात रुग्णांचे हाल होत आहे.
प्रसूत रुग्णांची संख्यांही अधिक
उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. नुकतीचे येथे शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचा लोंढा वाढला आहे. मात्र, प्रसूतीच्या रुग्णांना चादरी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. शस्त्रक्रिया झालेल्या महिलेस व बाळास चादरीअभावी रबराचे आवरण असलेल्या गादीवर झोपण्याची वेळ आली आहे.
प्राथमिक केंद्रांतून मागवितात औषधे
उपजिल्हा रुग्णालय असतानादेखील येथे पुरेसा औषधी साठा उपलब्ध नाही. तालुक्यातील प्राथमिक उपचार केंद्रात पाठविण्यात आलेल्या साठ्यातील उरलेल्या किंवा जादाचा औषधींवर दैनंदिन ओपीडी चालवली जात आहे. बरेचदा रुग्णांना बाहेरूनच औषधी घेण्याचा सल्ला दिला जातो.
व्हिडिओ काढणाऱ्यावरच कारवाई ?
उपजिल्हा रुग्णालयाची लख्तरे वेशीवर टांगणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केला आहे. उलट व्हिडीओ काढणाऱ्यावर कारवाईची भाषा आरोग्य विभाग करीत आहे. हा व्हिडीओ खरा असल्याचा दुजोरा रुग्ण व त्यांच्या नातलगांनी दिला आहे.
चादरींचा अभाव असल्याचा व्हिडीओ सोसल मीडियावर पाहिला आहे. रूग्णसंख्येनुसार चादरी कमी प्रमाणात असल्याने व या महिन्यात नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे झाल्याने सर्व चादरी धुण्याकरिता पाठविल्या आहेत.
- अमोल बोंदरे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय मोर्शी