खरिपासाठी दर्जेदार सोयाबीन बियाणे पुरवठा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:20+5:302021-04-29T04:09:20+5:30

अमरावती : जिल्ह्यासह विभागातील सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. येत्या खरीप हंगामात दर्जेदार सोयाबीन बियाणाचा पुरेसा पुरवठा व्हावा, ...

There should be supply of quality soybean seeds for kharif | खरिपासाठी दर्जेदार सोयाबीन बियाणे पुरवठा व्हावा

खरिपासाठी दर्जेदार सोयाबीन बियाणे पुरवठा व्हावा

Next

अमरावती : जिल्ह्यासह विभागातील सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. येत्या खरीप हंगामात दर्जेदार सोयाबीन बियाणाचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी महाबीज व खासगी कंपन्यांना निर्देश देण्याचा मुद्दा महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेटमध्ये मांडला. या मागणीचे निवेदनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषीमंत्री दादाजी भुसे यांना दिले.

विभागात सोयाबीन हे प्रमुख पीक असून सध्या सोयाबीनचे बाजारभाव पाहता सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. अमरावती जिल्ह्यात सोयाबीनसाठी २.७० लाख हेक्टर क्षेत्र अपेक्षित असून मागील वर्षी १.२५ लाख क्विंटल बियाणाची विक्री जिल्ह्यात झाली. त्या अनुषंगाने येत्या हंगामासाठी १.३० लाख क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे.

मागील हंगामात कापणीच्या वेळी पावसामुळे सोयाबीनची प्रत खालावली होती. त्याची परिणती चांगल्या घरगुती बियाणात घट होण्यात झाली. घरगुती सोयाबीनची कमी उपलब्धता लक्षात घेता येत्या खरीप हंगामासाठी अमरावती विभागात दर्जेदार बियाणाचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी महाबीज व खासगी कंपन्यांना शासनस्तरावरून आदेश व्हावेत, अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.

बॉक्स

गुणवत्तापूर्ण बियाणाचा पुरवठा आवश्यक

खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्र्यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीद्वारे घेतला होता. गत हंगामात सोयाबीनच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनेची भरीव अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार दर्जेदार बियाणाच्या पुरेशा उपलब्धतेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा होत आहे.

Web Title: There should be supply of quality soybean seeds for kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.