बडनेरा रेल्वे स्थानकाहूून ६४ गाड्यांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 08:01 PM2021-02-07T20:01:46+5:302021-02-07T20:01:51+5:30
अप-डाऊनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली, पॅसेंजर गाड्यांची मागणी मंजूर नाहीच
अमरावती : कोरोना काळात २२ मार्चपासून बंद असलेल्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकाहून विशेष आणि फेस्टीव्हल अशा एकूण ६४ रेल्वे गाड्या धावत आहेत. मात्र, सर्वसामान्यांसाठी अद्यापही पॅसेंजर गाडी सुरू न झाल्याने मागणी कायम आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकाहून देशाच्या कानाकोपऱ्यात ये-जा करण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू आहे. विशेष आणि फेस्टीव्हल गाड्यांनाच परवानगी मिळाली आहे. नियमित रेल्वे गाड्या कधी सुरू होणार, हे तूर्त स्पष्ट नाही. मात्र, विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश नसल्याने सामान्य प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याची ओरड आहे. छोट्या अंतरावरील प्रवासालासुद्धा आरक्षण घेऊनच गाड्यांमध्ये प्रवास करावा लागत आहे. ही बाब न परवडणारी असल्याची खंत अनेक प्रवाशांची आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकाहून तब्बल ६४ रेल्वे गाड्या धावत असल्याबाबत प्रवासी आनंद पाहावयास मिळत आहे. पॅसेंजर, इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी आहे.
अशा धावताहेत ६४ गाड्या
बडनेरा रेल्वे स्थानकाहून पुणे-अमरावती, पुणे-अजनी, मुंबई-गोंदिया, अहमदाबाद- पुरी, गांधीधाम -पुरी, पुणे-नागपूर हमसफर, पुणे-अजनी, अहमदाबाद -चैन्नई, कोल्हापूर- गोंदिया, अहमदाबाद- हावडा, मुंबई-हावडा, जयपूर -सिंकदरबाद, हिसार-सिंकदराबाद, कुर्ला-हावडा, ओखा-हावडा, पोरबंदर-हावडा, मुंबई -नागपूर, पुणे-नागपूर, कुर्ला -हटिया, कुर्ला- विशाखापट्टनम, तिरुपती -अमरावती. मडगाव- नागपूर, गांधीधाम-विशाखापट्टनम, जोधपूर-चैन्नई, अहमदाबाद- नागपूर, पुणे-नागपूर, मुंबई -नागपूर, सुरत-मालदाटाऊन अशा अप-डाऊनचा ६४ रेल्वे गाड्या धावत आहेत.