साथरोग प्रतिबंधासाठी ७७ पथकांचा राहणार वाॅच
By जितेंद्र दखने | Published: June 26, 2024 10:02 PM2024-06-26T22:02:14+5:302024-06-26T22:02:34+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून नियोजन
अमरावती: जिल्ह्यात मान्सूनमध्ये साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता आरोग्य विभाग सज्ज झाला असून, ७७ पथक आरोग्य विभागाने सक्रिय केले आहे. या ७७ पथकांवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांचे सात सदस्यीय पथक नियंत्रण ठेवणार आहे. मान्सूनपूर्व आढावा अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. यंदादेखील जिल्हास्तरावर सात सदस्यीय पथक तयार केले आहे. यामध्ये एका अधिकाऱ्यांना दोन तालुक्यांची जबाबदारी दिली आहे.
याशिवाय १४ तालुकास्तरावर एक स्वतंत्र पथक गठित केले आहे. अशा प्रकारे १४ पथक तालुक्यात भेट देऊन साथरोगावर प्रतिबंधासाठी वॉच ठेवणार आहे.जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरदेखील तीन ते चार कर्मचाऱ्यांचे भरारी पथक कार्यरत राहणार आहे. या पथकाकडे आरोग्य केंद्रांतर्गत जी गावे आहेत, तेथे आरोग्य सुविधा पुरवाव्या लागणार आहे. या जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ७७ भरारी पथक काम करणार आहे. जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.
संपर्क तुटणाऱ्या २० गावांमध्ये मुख्यालयी व्यवस्था
मेळघाटात धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या २० गावांमध्ये मुख्यालयीच सर्व सुविधा आरोग्य विभागाच्या वतीने पुरविण्यात आल्या आहे. येथे २० गावात प्रत्येकी १ भरारी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकात ४ ते ५ कर्मचारी राहणार आहे. या कर्मचाऱ्यांकडे आरोग्य किट दिली आहे. यामध्ये साथरोगाबाबतच्या सर्वच प्रकारच्या औषधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.