अनुसूचित जमातीच्या ‘नामांकित’ विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात होणार वाढ; शाळा संचालकांसाठी खुश खबर
By गणेश वासनिक | Published: January 12, 2024 05:45 PM2024-01-12T17:45:05+5:302024-01-12T17:45:17+5:30
शासनाकडे प्रती विद्यार्थी दहा हजार रूपये वाढीचा प्रस्ताव
अमरावती : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ईंग्रजी माध्यमांच्या ‘नामांकित’ शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना कार्यरत आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे जुन्या दराच्या शुल्कात आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शिक्षण देणे शक्य होत नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या ‘नामांकित’ विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात होणार वाढ केली जाणार असून, राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास शाळा संचालकांसाठी ही खुश खबर मानली जात आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील साक्षरतेचे प्रमाण ईतर प्रवर्गापेक्षा कमी आहे. उच्च शिक्षणात ईंग्रजी भाषेचा वापर जास्त प्रमाणात हाेत असल्यामुळे आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडत होता. त्यामुळे तालु्का, जिल्हा अथवा विभागीय स्तरावर असलेल्या ईंग्रजी माध्यमांच्या ‘नामांकित’ शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याविषयी २८ ऑगस्ट २००९ रोजी निर्णय लागू करण्यात आला.
दऱ्या, खोरे, वस्ती, वाड्यांमध्ये वास्तव्यास असलेले आदिवासी विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंत ईंग्रजी माध्यमाच्या ‘नामांकित’ शाळामध्ये शिक्षण घेऊ लागले. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने वेगवेगळे ‘स्पीड ब्रेकर’देखील लावले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता, वार्षिक निकालाच्या आधारे प्रवेशित असलेल्या शाळांच्या संस्था चालकांना शैक्षणिक शुल्क दिले जाते. आदिवासी विद्यार्थी ईंग्रजी शिक्षणात मागे होते. मात्र ईंग्रजी माध्यमांच्या ‘नामांकित’ शाळेत प्रवेश या योजनेमुळे गेल्या १५ वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवाहात मोठा बदल झाला आहे. आता शैक्षणिक संस्था चालकांच्या मागणीनुसार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात होणार वाढ केली जाणार आहे. याविषयी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त डॉ. नयना गुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.
राज्यात ‘नामांकित’ शाळांवर एक दृष्टिक्षेप...
एकूण शाळा: १४८
ठाणे : ११२४८ विद्यार्थी
अमरावती : १४३०० विद्यार्थी
नाशिक: २०४६७ विद्यार्थी
नागपूर : ७६०० विद्यार्थी
‘नामांकित’ शाळांमध्ये या बाबी आवश्यक
शाळांमध्ये भौतिकसुविधा आवश्यक असाव्यात. स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, तज्ञ्ज शिक्षक, वसतिगृह, क्रीडा शिक्षक यासह २० विद्यार्थ्यांमागे एक स्नानगृह व स्वच्छता गृह अनिवार्य आहे. स्वतंत्र किचन, टीव्ही, वाचन साहित्य, वॉश बेसिन, निवास व्यवस्था, २४ तास नर्स उपलब्ध, विद्यार्थ्यांना पाल्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल अथवा भ्रमणध्वनी, सीसीटीव्ही, वसतिगृहात सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा यासह साबण, खोबरेल तेल, टुथपेस्ट, पॅनकीन वैयक्तिक साहित्य, शैक्षणिक साहित्य आदी आवश्यक आहे.
हल्ली असे मिळते गुणांकनावर प्रती विद्यार्थी शुल्क
- ८० किंवा त्यापेक्षा अधिक गुण: ७० हजार रूपये
- ७० ते ७९ गुण : ६० हजार रूपये
- ६० ते ६९ गुण: ५० हजार रूपये
- ६० पेक्षा कमी गुण : शाळांचे प्रस्ताव अप्राप्त ठरविले जातात.