फरदळ घेणे भोवणार बोंडअळी उद्रेक होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:03 PM2024-05-13T13:03:55+5:302024-05-13T13:05:45+5:30
Amravati : कपाशीची पूर्वहंगामी लागवडही ठरणार घातक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षीच्या खरिपात मार्चपर्यंत काही शेतकऱ्यांनी घेतलेला कपाशीचा खोडवा व कृषी विभागाने १६ मे पासून बीटी बियाणे विक्रीला दिलेली परवानगी यामुळे कपाशीची पूर्वहंगामी लागवड होणार आहे. यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने यंदाच्या खरिपात बोंडअळीचा धोका कित्येक पटीने वाढला आहे.
दरवर्षी ३१ मेपर्यंत बियाणे विक्रीस प्रतिबंध होता. यंदा मात्र १६ मेपासून बियाणे विक्रीची मुभा दिलेली आहे. अशा परिस्थितीत हंगामपूर्व कपाशीची लागवड झाल्यास बोंडअळीचे नियंत्रण कसे करणार, यासाठी जबाबदार कोण ? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यापूर्वी सन २०१७ हंगामात गुलाबी बोंडअळीचा उद्रेक झाला होता. त्यानंतर सातत्याने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. यापूर्वी बीटी बियाणांची ३१ मेपर्यंत विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. यंदा मात्र १६ मेपासून बीटी बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कृषी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास यंदादेखील प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. हंगामपूर्व कपाशीची लागवड झाल्यास बोंडअळीच्या जीवनक्रमाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
कंपन्यांच्या दबावात निर्णय, शेतकऱ्यांचा आरोप
● दरवर्षी १ जूननंतर तर यंदा मात्र १६ मेपासून बियाणे विक्री खुली करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, त्यांच्याद्वारा हंगामपूर्व बीटी कपाशीची लागवड झाल्यास पुन्हा बोंडअळीचे संकट ओढवणार आहे.
● या दिवसात नांगरणी व कडक उन्हानंतर बोंडअळीचे पतंग नष्ट होण्याची शक्यता असते; मात्र १५ दिवस पूर्व बियाणे विक्री खुली केल्याचा निर्णय बियाणे कंपन्यांच्या दबावात घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
● गतवर्षीच्या खरीप हंगामातील कपाशीचा खोडवा यंदा मार्चपर्यंत घेण्यात आला. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्याऐवजी तिला खाद्य मिळाल्याने यंदा बोंडअळीच्या उद्रेकाची शक्यता आहे.
उशिराच पेरा
बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व पेरणी टाळावी.
यंदा १६ मेपासून बियाणे विक्री होणार असल्याने ड्रीपवर काही शेतकरी हंगामपूर्व कपाशी लागवड करतील. शिवाय काही शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कपाशीचा खोडवा घेतला, त्यामुळे यंदाच्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
- पवन देशमुख, कृषितज्ज्ञ