वरूड, मोर्शी तालुक्यांत यंदा नसणार पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 05:00 AM2020-10-31T05:00:00+5:302020-10-31T05:00:18+5:30
जितेंद्र दखने लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजलपातळी सरासरी चार फुटांनी वाढली. तथापि, गाळाचा ...
जितेंद्र दखने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजलपातळी सरासरी चार फुटांनी वाढली. तथापि, गाळाचा प्रदेश असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात पाणीपातळी सरासरी एक फुटाने घटली. दुष्काळात अनेक वर्षे होरपळत असणाऱ्या वरूड, मोर्शी तालुक्यांमध्ये यंदा मात्र पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा विश्वास भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला.
जिल्ह्यात एकूण ६३ पाणलोट क्षेत्रे असून, त्यामधून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाद्वारे १५० निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीची वाचने वर्षातून चार वेळा घेण्यात येतात. ऑक्टोबरअखेर घेण्यात आलेल्या भूजलपातळीच्या नोंदीचा मागील पाच वर्षांच्या ऑक्टोबर महिन्याच्या भूजल पातळीच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास केला असता, जिल्ह्यात सरासरी १.२७ मीटरने पाणीपातळी वाढल्याचे दिसून येते. यावर्षी सर्वात जास्त १.८५ मीटरने पाणीपातळी अमरावती तालुक्यात वाढली आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात पाण्याची खोली ३० मीटरपेक्षा जास्त गेल्यामुळे तेथील जवळपास सर्वच सिंचन विहिरी, ज्यांची खोली २५ ते ३० मीटर आहे, कोरड्यात पडल्या. तालुका मुख्यालयी एकच निरीक्षण विहीर असून, त्या परिसरात उपसा नाही. यामुळे सरासरी तीन मीटर पाण्याची पातळी वाढली असल्याचे निश्चित करण्यात आले.
वरूड, मोर्शी तालुक्यात गतवर्षी व यावर्षीदेखील १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. वरूडमध्ये यंदा पाण्याची पातळी सरासरी १.५७ मीटरने व मोर्शी तालुक्यात १.५१ मीटरने वाढली, यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये टंचाई निर्माण होणार नाही. जिल्ह्यात सरासरी ७९२.३७ मिमी पाऊस झाला. सप्टेंबरअखेर पावसाने १०८.९३ अशी टक्केवारी गाठली. भूजलपातळीत १.२७ मिमीने वाढ झाली आहे.
चांदूर बाजार तालुका हा गाळाचा प्रदेश असून, संत्रा बागायतदार कूपनलिकांतून सतत उपसा करीत आहेत. त्यामुळे या तालुक्यात आठ ते दहा वर्षांपासून पाण्याची पातळी सतत खालावत आहे. यावर्षीसुद्धा ०.२५ मीटर अर्थात सरासरी एक फुटाने पाण्याची पातळी खालावली. गाळाचा प्रदेश असल्याने यामध्ये पावसाचे पुनर्भरण जलद गतीने होत नाही. त्यामुळे येथे भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना गरजेच्या आहेत.
धारणी व चिखलदरा हा परिसर कठीण खडकाचा व उंच-सखल असल्याने येथे पावसाचे पाणी लगेच वाहून जाते. भूजलाचे पुनर्भरण पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने निरीक्षण विहिरींच्या आधारे अंदाज घेणे शक्य नाही. परंतु, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या निरीक्षण विहिरींच्या अनुषंगाने तेथे पाणीपातळीत वाढ झाली आहे.
या कारणांनी वाढली भूजलपातळी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुबलक पाऊस झाला. पावसाच्या दिवसांत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. याशिवाय सततच्या पावसामुळे शेतातील ओलावा कायम राहिल्याने खरिपाच्या सिंचनासाठी विहिरीद्वारे उपसा झाला नाही.
जलयुक्त शिवार तसेच जलसंधारणाची कामे झाल्याने भूजलात वरूड व मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी या दोन्ही तालुक्यांसह चांदूर बाजार तालुक्यात अटल भूजल योजनेंतर्गत भूजल पुनर्भरणाचे सर्वेक्षण व आराखडे तयार करण्यात येत आहेत.
- विश्वास वालदे,
वरिष्ठ भूवैज्ञानिक