१२८ बदलीपात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होतील बदल्या; अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले एकाच जिल्ह्यात
By गणेश वासनिक | Published: April 21, 2024 01:14 PM2024-04-21T13:14:49+5:302024-04-21T13:18:57+5:30
एकाच जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या; आरएफओंच्या मंत्रालयात येरझारा
अमरावती : राज्यातील बदली पात्र १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलींचे सूत्र मंत्रालयातून हलणार असल्याने अनेक वनाधिकारी मंत्रालयात फिल्डिंग लावताना दिसत आहे. एकाच वेळी होणाऱ्या राज्यस्तरीय बदल्याची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे ठाण मांडून बसलेल्यांना यावेळेस मात्र बाहेर पडावे लागेल, असे एकंदरीत चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकारी वनमंत्रालयाने स्वत:कडे घेतलेले आहेत. यामुळे मुख्य वनसंरक्षकांचे बदलींचे अधिकार संपुष्टात आले असून लागेबांधे ठेवत जिल्ह्यात राहणाऱ्या काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गोची झालेली आहे. शासन निर्णयानुसार यापुढे सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन्यजीव, कार्य आयोजना असा बदली प्रवास करावा लागेल. शिवाय तीन वर्षांच्यावर एकाच ठिकाणी थांबता येणार नाही, कारण आरएफओंचे पद हे राज्यस्तरीय असल्यामुळे बदल्यांचा निकष राज्यस्तरीय लावण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्हा बदल होणार आता या निर्णयावरून स्पष्ट झालेले आहेत. कारण महाराष्ट्रातील निवडणूक संपल्यानंतर प्रशासकीय धोरणात शिथिलता येऊन ३१ मे पर्यंत राज्यातील १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा पोळा फुटणार हे निश्चित झाले आहे.
मंत्रालयात जोरदार फिल्डिंग
१२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली यादी १५ मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर अनेक वनाधिकारी मार्च एंडींगनंतर सक्रिय झालेले आहे. मंत्रालयात सध्या वनसचिव उत्तराखंडमध्ये प्रशिक्षणावर असून ते २९ एप्रिलपासून मंत्रालयात विराजमान होणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील काही आरएफओ आपापल्या परीने भेटीगाठी कोणी जागा मिळवायची ही सोय तयारी करण्याठी मंत्रालय गाठत आहेत. राज्यातील ७५ च्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी मंत्रालयाच्या पायरीचे दर्शन करून परतल्याची माहिती आहे.
एकाच जागी ठाण मांडून बसलेत
गेल्या ४ वर्षांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या वनप्रशासनाकडे आलेल्या आहेत. मुख्य वनसंरक्षक दर्जाच्या वनाधिकाऱ्याशी लागेबांधे असणारे आरएफओ जिल्ह्यात अर्धी अधिक नोकरी करत आहेत. कधी सामाजिक वनीकरणनंतर प्रादेशिक असा बदली प्रवास सध्या सुरू आहेत. जिल्ह्यात राहण्याकरिता लक्ष्मी दर्शन दाखविण्याची प्रथा असल्याने १२८ च्या बदली यादीत १०० च्या जवळ वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग ३ प्रमाणे बदल्या करताना दिसून येतात. बनावट कारणे आणि लाखो रुपयांची उलाढाल यामुळे अनेकांना जिल्ह्यात राहतात येते अशी स्थिती आरएफओंच्या बदल्यांमध्ये यास आता मात्र ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे.