चोरासारखे आले अन् गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:52 AM2018-12-09T00:52:22+5:302018-12-09T00:54:13+5:30
पालकमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी चोरासारखे येऊन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन केले व चोरासारखे निघून गेले, असा थेट प्रहार आ. रवी राणा यांनी बडनेरा येथे केला. विविध विकासकामांच्या सोहळ्याच्या मंचावरून शुक्रवारी आ. राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांना लक्ष्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : पालकमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी चोरासारखे येऊन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन केले व चोरासारखे निघून गेले, असा थेट प्रहार आ. रवी राणा यांनी बडनेरा येथे केला. विविध विकासकामांच्या सोहळ्याच्या मंचावरून शुक्रवारी आ. राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांना लक्ष्य केले.
युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने बडनेऱ्यातील जयस्तंभ चौकात आ. रवि राणा यांच्याद्वारे सात कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नवनीत राणा यांनीही उपस्थितांना संबोधित केले. सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन पार पडले. त्याला उपस्थित राहिलेल्या शेकडो नागरिकांपुढे आ. राणा यांनी अपेक्षेनुरूप राजकीय फटकेबाजी केली. यावेळी नगरसेविका सुमती ढोके, आशिष गावंडे, अयूबभाई, कांचन ग्रेसपुंजे, मजिद कुरेशी, निळकंठराव कात्रे, अजय मोरय्या, संजय हिंगासपुरे उपस्थित होते.
मिलची जागा तरी पाहिली का?
प्रवीण पोटे हे उद्योग राज्यमंत्री आहेत; त्यांनी विजय मिलची जागा तरी पाहिली का? या जागेचा सातबारा माझ्या नावे दाखवून द्या; माझी पत्नी नवनीत राणा खासदारकीची निवडणूक लढणार नाही, असे थेट आव्हान आ. राणा यांनी दिले.
अडसूळ बिनकामाचे खासदार
आनंदराव अडसूळ हे बिनकामाचे खासदार आहेत. अमरावतीशी त्यांना काही घेणे-देणे नाही. मोदींची सभा झाली म्हणून ते निवडून आले. ‘अडसूळ मजबुरी है, मोदी जरूरी है’ असे म्हणत मतदारांनी त्यांना खासदार केले, असे आ. राणा म्हणाले.
दुसऱ्यांदा भूमिपूजन?
नव्या वस्तीतील काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन २ डिसेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याचेच दुसºयांदा भूमिपूजन करून आ. रवि राणा हे नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपजनांकडून होत आहे. तथापि, यासंदर्भात भाजप शहर अध्यक्ष जयंत डेहनकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.