दारूबंदीसाठी ‘त्या’ रस्त्यावर काढतात रात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:33+5:302021-09-27T04:13:33+5:30

फोटो - गुंजी गावात दारूबंदीचा उडाला फज्जा, पोलिसांचा वचक संपला, बापाच्या ग्लासमध्येच मुले तर्राट मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : ...

They spend the night on the streets for alcohol ban! | दारूबंदीसाठी ‘त्या’ रस्त्यावर काढतात रात्र!

दारूबंदीसाठी ‘त्या’ रस्त्यावर काढतात रात्र!

Next

फोटो -

गुंजी गावात दारूबंदीचा उडाला फज्जा, पोलिसांचा वचक संपला, बापाच्या ग्लासमध्येच मुले तर्राट

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : गावातील काही पुरुषांचे अर्धे आयुष्य दारूमध्ये गेले. आता त्यांच्या मुलांचे भविष्य तरी अंधकारमय होऊ नये म्हणून दिवसभर शेतात काबाडकष्ट केल्यानंतर गावात रात्रीला देशी दारूची पेटी येऊ नये म्हणून गावातील महिला शीवेवर काठ्या घेऊन रात्र जागून काढतात. तरीही दुसऱ्या दिवशी बापाच्या ग्लासमध्येच मुले तर्राट होतात. तब्बल चार वेळा प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अवैध दारूविक्रेत्यांना कोणताच धाक उरलेला नाही. पोलिसांनाही आरोपी सापडत नसल्याने गुंजी गावात दारूबंदी फज्जा उडाला आहे.

तालुक्यातील एक हजार लोकवस्तीचे गाव गुंजी येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज यांचे शिष्य चिंधे महाराज यांची समाधी असल्याने हे गाव प्रसिद्ध आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या गावात अवैध दारूचा व्यवसाय थेट किराणा दुकानातून सुरू असल्याच्या तक्रारी राज्याच्या गृहखात्यापर्यंत पोहोचल्या आहेत. गावात अवैधरीत्या संबंधित किराणा दुकानात दारू येत असल्याचे पाहायला मिळत आहे. पतीसोबतच आता अल्पवयीन मुलेही रात्री नशेत असतात. वर्तमान अंधारात आणि भविष्य चाचपडत असल्याने आपल्या गावात कोण दारू पोहोविचतो, यासाठी येथील महिला बचत गटाने एकत्र येऊन मागील आठ दिवसांपासून रात्रीला गावातून जाणाऱ्या धामणगाव, अंजनसिगी, कावली वसाड, तरोडा या प्रत्येक मार्गावर ये-जा करणाऱ्यांची तपासणी सुरू केली. शनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत या महिलांनी रात्र जागून काढली.

बॉक्स

पोलिसांनाही जुमानेना दारूविक्रेते

गुंजी गावात एक वर्षापासून अवैधरीत्या दारूचा धंदा किराणा दुकानातून सुरू आहे. पोलिसांनी या किराणा दुकानातच अनेक वेळा दारू पकडली. नजीकचे अशोकनगर, तरोडा, ढाकुलगाव येथील काही लोक दारू पिण्यासाठी येतात. तथापि, बहुतांश वेळा पोलिसांची धाड पडण्यापूर्वीच टीप मिळत असल्याने शेतात दारू लपविली जाते, अशी माहिती महिला बचत गटाच्या महिलांनी दिली. पोलिसांचा वचक संपल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीचा ठराव अन् आठ निवेदने

गावातील अवैध दारू बंद व्हावी, याकरिता ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा पवार यांनी ठराव घेतला. तद्नंतर महिला बचत गटाच्या महिलांनी पालकमंत्री ते जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत सर्वच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले. तरीही या गावातील दारू बंद झाली नाही. आता आम्हीच रात्रभर रस्त्यावर उभ्या राहून पाळत ठेवत असल्याचे या महिलांनी सांगितले.

------------

गुंजी येथील किराणा दुकानावर धाड टाकून आतापर्यंत कारवाई केली आहे. महिला बचत गटांनी तक्रारी केल्या तेव्हा आम्ही सतर्क राहून येथील दारूविक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

- ईश्वर वर्गे, पोलीस निरीक्षक, कुऱ्हा

----------------

दोन दिवसांत पोलीस प्रशासनाने अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली नाही, तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

- प्रताप अडसड, आमदार

Web Title: They spend the night on the streets for alcohol ban!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.